भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारीच्या पहाटे पावणेचार वाजता पाकिस्तानातील बालाकोट येथील जैश-ए-महम्मदच्या तळावर हवाई हल्ले करुन हे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४१ जवान ‘जैश-ए-महम्मद’च्या भीषण हल्ल्याला उत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली होती. मात्र हल्ला करण्यासाठी नेमकी २६ फेब्रुवारीची रात्र का निवडण्यात आली यासंदर्भात आता माहिती पुढे आली आहे. या हवाई हल्ल्याची सर्व सुत्रे संभाळणारे एअर मार्शल (निवृत्त) चंद्रशेखरन हरी कुमार यांनी २६ तारखेची रात्र का निवडण्यात आली आणि त्या रात्री पोर्णिमा असल्याने त्याचा या हल्ल्यासाठी कसा फायदा झाला यासंदर्भात माहिती दिली आहे.

बालाकोट हल्ल्यासाठी २५ आणि २६ फेब्रुवारीची रात्र का निवडण्यात आली असा प्रश्न हरी कुमार यांना ‘दैनिक भास्कर’ वृत्तपत्राने घेतलेल्या विशेष मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी नेमकी याच तारखेची निवड करण्यामागील कारणे सांगितली. ‘अगदी सर्व कारणे मला गोपनियतेमुळे सांगता येणार नाहीत’ असं हरी कुमार यांनी स्पष्ट केले पण काही कारणांचा त्यांनी आवर्जून खुलासा केला. ‘हल्ल्याचा वेळ निवडण्याची काही कारणे सांगायची झाल्यास जेव्हा सर्व दहशतवादी एकाच ठिकाणी गोळा झालेले असतील अशा वेळी हल्ला करण्याच्या उद्देशाने रात्री हल्ला करण्याचे ठरवले. सकाळी चार वाजता बालाकोट येथील दहशतवादी तळांवर पहाटे नमाज अदा केला जातो. त्यामुळे तेथे खूप मोठ्या प्रमाणात हलचाल सुरु होते यावर आम्ही बरेच दिवस नजर ठेऊन होतो. त्यामुळेच ते दहशतवादी तीन ते चारच्या सुमारास झोपलेले असणार. भारतातील रात्रीचे साडेतीन म्हणजे पाकिस्तानमधील रात्रीचे तीन वाजले असताना आम्ही हल्ला केला. तसेच त्या रात्री पोर्णिमा असल्याने पहाटे तीन ते चारच्या दरम्यान चंद्र क्षितीजापासून ३० अंशावर होता. यावेळेस पृथ्वीवर पडणारा चंद्राचा प्रकाश सर्वाधिक असतो. त्या रात्री पश्चिमेकडील हवामान अगदी स्वच्छ होते. त्याचा फायदा अचूक लक्ष्यवेध घेण्यासाठी झाला,’ असं हरी कुमार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान या हल्ल्यानंतर ही लष्करी कारवाई नसून प्रतिबंधात्मक होती असं भारताने स्पष्ट केलं होतं. या हल्ल्यामध्ये केवळ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यातं आलं. पाकिस्तानी सुरक्षा दले, आस्थापना आणि नागरी वस्त्यांची कोणतीही हानी झालेली नाही, असे स्पष्टीकरण परराष्ट्र सचिवांनी दिले होते. भारतीय हवाई दलाने आंतरराष्ट्रीय नियमांचे काटेकोर पालन करीत ही कारवाई पार पाडली होती.