भारताने अमेरिकेला हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन या औषधांचा पुरवठा करण्यास मंजुरी दिल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय आणि नरेंद्र मोदी यांचे आभार मानणारं ट्विट केलं. ‘तुम्ही केलेली मदत कधी विसरणार नाही’ असं त्यांनी टि्वटमध्ये म्हटलं होतं.

ट्रम्प यांच्या या टि्वटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिसाद दिला आहे. “प्रेसिडंट तुमच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. अशाच परिस्थितीत मित्र जास्त जवळ येतात. भारत-अमेरिका मैत्री पहिल्यापेक्षा जास्त मजबूत झाली आहे. करोना व्हायरस विरोधी या लढयात मानवतेच्या दृष्टीकोनातून भारत शक्य असेल ती सर्व मदत करेल” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

सोमवारी हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन या औषधाच्या पुरवठयावरुन ट्रम्प यांनी भारताला जशास तसं उत्तर देण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर राजकारण करु नका, सर्वांना मदत करु असे भारताने सांगितल्यानंतर लगेच मंगळवारी ट्रम्प यांचा सूर बदलला. नरेंद्र मोदी महान नेते आहेत, भारतावर त्यांनी कौतुकाचा वर्षाव केला.

ट्रम्प यांनी टि्वटमध्ये काय म्हटलयं
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय आणि नरेंद्र मोदी यांचे आभार मानणारं ट्विट करत तुम्ही केलेली मदत कधी विसरणार नाही असं म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “कठीण काळात मित्रांकडून जास्तीत मदतीची गरज असते. हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन संबंधी घेतलेल्या निर्णयाबद्दल भारत आणि भारतीय लोकांचे आभार. हे विसरु शकत नाही. या लढाईत आपल्या मजबूत नेतृत्त्वाने फक्त भारतीय नाही तर माणुसकीची मदत करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही आभार”.