टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी- मुख्यमंत्री सरमा

राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या काही विशिष्ट योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आसाम सरकार टप्प्याटप्प्याने दोन-अपत्ये धोरणाची अंमलबजावणी करणार असल्याचे शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री हिमंत विश्वा सरमा यांनी सांगितले.

तथापि, प्रस्तावित लोकसंख्या नियंत्रण धोरण आसाममधील सर्व योजनांसाठी त्वरित लागू होणार नाही कारण काही योजनांचे लाभ केंद्र सरकारकडून दिले जातात, असेही सरमा यांनी येथे एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विनामूल्य प्रवेश किंवा पंतप्रधान आवास योजनेखालील घरे यासाठी आम्ही दोन-अपत्ये धोरणाचा अवलंब करू शकत नाही. परंतु राज्य सरकारने एखादी गृहनिर्माण योजना सुरू केली तर त्यासाठी दोन-अपत्ये धोरणाची अंमलबजावणी केली जाऊ शकते, त्यानंतर टप्प्याटप्प्याने हा निकष राज्य सरकारच्या सर्व योजनांसाठी लागू होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

विरोधकांनी सरमा यांना यांच्या कुटुंबातील सदस्य संख्येवरून लक्ष्य केले, त्यावर सरमा यांनी टीका केली. सरमा पाच भावंडांच्या कुटुंबातील आहेत. आपल्या पालकांनी अथवा अन्य लोकांनी १९७० च्या दशकात काय केले त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही, असे सरमा म्हणाले.