ब्रिटनच्या माजी पंतप्रधान ‘आयर्न लेडी’ मार्गारेट थॅचर यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी अन्त्यसंस्कार करण्यात आले. लष्कराच्या वतीने दिवंगत माजी पंतप्रधानांना मानवंदना देण्यात आली, तर लक्षावधी शोकाकुल जनतेने रस्त्यांच्या दुतर्फा उभे राहून त्यांना आदरांजली वाहिली.
वेस्टमिन्स्टर येथील भव्य प्रासादातून थॅचर यांचे पार्थिव शवपेटिकेमधून बाहेर आणण्यात आले आणि त्यानंतर ते शववाहिनीवर ठेवण्यात आले. त्यानंतर सेंट पॉल्स कॅथ्रेडल येथे राणी एलिझाबेथ (दुसरी) यांच्यासह २३०० अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या उपस्थितीत थॅचर यांच्या पार्थिवावर अन्त्यसंस्कार करण्यात आले.
अन्त्यसंस्कारांच्या मार्गावर काही जणांनी निदर्शनेही केली. थॅचर यांच्या पार्थिवावर समारंभपूर्वक अन्त्यसंस्कार करण्यात येणे हा पैशांचा अपव्यय असल्याचा आरोप निदर्शकांनी केला. माजी पंतप्रधान दिवंगत विन्स्टन चर्चिल यांच्या पार्थिवावर समारंभपूर्वक अन्त्यसंस्कार करण्यात आले होते.
ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी, समारंभपूर्वक अन्त्यसंस्कारांचे जोरदार समर्थन केले. माजी पंतप्रधानांचा योग्य सन्मान राखण्यात आला, असेही कॅमेरून म्हणाले.
अन्त्यसंस्कारांच्या ठिकाणी अथवा वाटेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जवळपास चार हजारांहून अधिक अधिकारी तैनात करण्यात आले होते. बोस्टन येथे झालेल्या बॉम्बस्फोटांच्या पाश्र्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात आली होती.
थॅचर यांच्या अन्त्यसंस्कारांसाठी १७० देशांच्या शाही कुटुंबातील सदस्य, राजकीय नेते, ज्येष्ठ मुत्सद्दी उपस्थित होते.