मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला संजीवनी देण्यासाठी व्यक्तिगत प्राप्तिकराच्या सुसूत्रीकरणासह आणखी काही उपाययोजना करण्याचा विचार आहे, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत आर्थिक विकास दर सहा वर्षांत निचांकी म्हणजे ४.५ टक्के इतका खाली आला असून पहिल्या तिमाहीत तो ५ टक्के होता.

ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या होत्या, असे त्यांनी एका वृत्तपत्राने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सांगितले. त्या म्हणाल्या की, सार्वजनिक बँकांना आर्थिक शिस्तीचे निकष न डावलता ५ लाख कोटी रुपये देण्यात आले असून वस्तूंचा खप वाढवण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. पायाभूत क्षेत्रावर खर्च वाढवून अप्रत्यक्ष पद्धतीने खप वाढवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

आणखी काही उपाययोजना करणार आहात का, असे विचारले असता त्यांनी सांगितले की, मी जर हो म्हटले तर तुम्ही केव्हा असा  प्रश्न विचारणार पण आता अर्थसंकल्पही जवळ आहे. त्यामुळे त्याआधी काही उपाययोजना केल्या जातील असे मी म्हणणार नाही, पण आम्ही बऱ्याच उपाययोजनांवर विचार करीत आहोत.

व्यक्तिगत प्राप्तिकराचे सुसूत्रीकरण करणार का, असे विचारले असता त्या म्हणाल्या की,‘ त्यावर आम्ही  विचार करीत आहोत.’  करदात्यांची छळवणूक करीत असल्याच्या आरोपाचा त्यांनी इन्कार केला.

कंपनी कर कमी केल्यानंतर आता व्यक्तिगत प्राप्तिकर कमी करण्याची मागणी होत आहे. सरकारने गेल्या २८ वर्षांत प्रथमच कंपनी कर कमी करून कंपन्यांना १.४५ लाख कोटींची सवलत दिली होती. सध्याच्या कंपन्यांसाठीचा कर ३० टक्क्य़ांवरून २२ टक्के, तर नवीन कंपन्यांवरचा २५ टक्क्य़ांवरून १५ टक्के केला होता.