पश्चिम नेपाळ व उत्तर भारतात पुन्हा मोठय़ा तीव्रतेचा भूकंप होण्याची शक्यता वैज्ञानिकांनी वर्तवली आहे. नेपाळमध्ये एप्रिल महिन्यात ७.८ रिश्टरचा भूकंप झाला होता. त्यात भूगर्भातील कोंडलेली पूर्ण ऊर्जा प्रस्तरभंगाच्या ठिकाणातून बाहेर पडलेली नाही; ती बाहेर पडण्याच्या रूपातून हा पुढचा भूकंप होऊ शकतो असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.
ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम व त्वरणक (अ‍ॅक्सिलरोमीटर) या यंत्रांच्या मदतीने काठमांडू येथील जमिनीच्या आतील हालचाली टिपण्यात आल्या असून भूकंप केंद्रे व रडार प्रतिमांनीही माहिती दिली आहे. त्याचा एकत्रित विचार करून वैज्ञानिकांनी भूकंपाचा इशारा देताना म्हटले आहे की, नेपाळमध्ये गोरखाजवळ २५ एप्रिलला ७.८ रिश्टरचा भूकंप झाला, त्या वेळी नऊ हजार लोक ठार झाले होते. पण अजूनही नेपाळ व उत्तर भारत या दोन ठिकाणी लक्ष ठेवण्याची गरज आहे. गंगेच्या पठारावरील पश्चिम नेपाळ व उत्तर भारतात लोकसंख्येची घनता जास्त आहे, त्यामुळे आता पुन्हा मोठा भूकंप झाला तर तेथे मोठी प्राणहानी होईल, असे केंब्रिज विद्यापीठाचे प्राध्यापक जीन फिलीप अ‍ॅवॉक यांनी सांगितले.
संशोधकांनी असे दाखवून दिले आहे की, मुख्य हिमालयाच्या प्रदेशात एक मोठा प्रस्तरभंग झालेला असून उत्तर भारत आता भूपृष्ठाखालील एक प्लेट (भूस्तर) युरेशियाकडे ढकलतो आहे व त्याचा वेग दरवर्षी २ सेंटिमीटर आहे. त्यामुळे हिमालयाचे स्थानही बदलत आहे. जीपीएस मापनानुसार या थराचा बराचसा भाग अडकलेला आहे, त्यात ऊर्जा अडकलेली आहे. मोठे भूकंप खालच्या भागातील टेक्इंडियन प्लेटवरच्या युरेशियन प्लेटला खाली खेचते, त्यामुळे भूगर्भात ताण निर्माण होतो. नंतर वरच्या युरेशियन प्लेटला तो सहन झाला नाही की ऊर्जा बाहेर पडण्याचा प्रयत्न करते व त्यातून मोठा भूकंप होतो. यातील काही ताण नेपाळमधील पोकर्णाच्या पश्चिमेपासून दिल्लीच्या उत्तरभागापर्यंत पसरला गेला आहे. पश्चिम नेपाळमध्ये अशा प्लेटस आहेत जिथे मोठा ताण निर्माण करणारी ऊर्जा अडकलेली आहे व तेथे १५०५ मध्ये ८.५ रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला होता, त्यानंतर भूकंप झालेला नाही. नवीन ताण दुसरीकडे गेल्याने गेल्या पाच शतकात भूगर्भीय ताणात आणखी वाढ झाली आहे. गोरखा भूकंपानंतर जमिनीचा थोडा भाग भंग पावला होता, त्यामुळे अजून पूर्ण भूगर्भीय ऊर्जा बाहेर पडलेली नाही. त्यामुळे मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. कालटेक येथील भूगर्भशास्त्रज्ञ अ‍ॅवॉक यांनी म्हटले आहे की, गोरखा येथील भूकंपाने हिमालयाच्या भागातील सर्व ऊर्जा बाहेर आलेली नाही, त्यामुळे आगामी काळात हिमालयामुळे मोठे भूकंप होतील पण ते केव्हा होतील हे मात्र सांगता येत नाही. २५ एप्रिलला नेपाळमधील गोरखा जिल्ह्य़ात झालेल्या भूकंपात काठमांडूपासून २५ कि.मी. अंतरावर केंद्रस्थान होते.

संशोधनातील माहिती
’जीपीएस, भूकंप केंद्रे, त्वरणक यांच्या मदतीने माहिती गोळा.
’नेपाळच्या भूकंपात भूगर्भ ऊर्जा पूर्ण बाहेर पडलेली नाही.
’लोकसंख्येची घनता जास्त असल्याने मोठी प्राणहानी शक्य.