रिटेल क्षेत्रातील अग्रगण्य ‘फ्युचर ग्रुप’ने मॅगीच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ‘फ्युचर ग्रुप’च्या अधिपत्याखाली असलेल्या देशभरातील ‘बिग बाजार’, ‘निलगिरी सुपरमार्केट’ आणि ‘इजी-डे’ या सर्व रिटेल मॉल्समधून मॅगी हद्दपार होणार आहे. ‘मॅगी’च्या नमुन्यात हानिकारक पदार्थांचे प्रमाण आढळून आल्याने सुरू असलेला वाद आणि ग्राहकांच्या भावना लक्षात घेऊन मॅगीची विक्री थांबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ‘फ्युचर ग्रुप’च्या वतीने सांगण्यात आले आहे. देशभरातील तब्बल २५९ शहरांमध्ये असलेल्या ‘बिग बाजार’च्या सर्व आऊटलेट्समधून मॅगीची विक्री बंद होणार आहे. ‘फ्युचर ग्रुप’सारख्या रिटेल क्षेत्रातील मोठ्या कंपनीने घेतलेला हा निर्णय मॅगीचे उत्पादन करणाऱया नेसले कंपनीसाठी मोठा धक्का ठरणार आहे.
‘मॅगी’प्रकरणी अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, प्रिती झिंटावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
दरम्यान, मॅगीच्या नमुन्यात शिसे व मोनो सोडियम ग्लुटामेट (अजिनोमोटो) या हानिकारक पदार्थाचे मोठे प्रमाण आढळल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ‘मॅगी’बाबात साशंकता निर्माण झाली आहे. तसेच मुझफ्फरपूरमधील न्यायालयाने नेसले कंपनीचे अधिकारी आणि उत्पादनाची जाहिरात करणारे अभिनेते अमिताभ बच्चन, अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि प्रिती झिंटा यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीसांना दिले. दिल्लीत देखील मॅगीचे नमुने सदोष असल्याची माहिती मंगळवारी समोर आली होती तर, केरळ राज्य शासनानेही राज्यातील सरकारी दुकानांमध्ये ‘मॅगी’च्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्याचा घेतला आहे.