भारतीय प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ अधिकारी जी. मोहनकुमार यांची नवे संरक्षण सचिवपदी शनिवारी नियुक्ती करण्यात आली.
मोहनकुमार हे ओदिशा केडरच्या १९७९ चे अधिकारी असून सध्या संरक्षण उत्पादन विभागात सचिव म्हणून कार्यरत आहेत. मोहनकुमार यांच्या नियुक्तीवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या समितीने शिक्कामोर्तब केले असून त्यांनी सूत्र हाती घेतल्यानंतर त्या तारखेपासून त्यांची नियुक्ती दोन वर्षांसाठी असेल, असे संबंधित आदेशात म्हटले आहे. विद्यमान संरक्षण सचिव राधाकृष्ण माथूर यांची मुदत येत्या २८ मे रोजी संपत असून त्यांच्याकडून मोहनकुमार सूत्रे स्वीकारतील.
वड्रा यांच्या जमीन व्यवहारांची चौकशी राजकीय सूडबुद्धीतून -काँग्रेस
पीटीआय, चंदीगड
सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्यासह इतरांचा सहभाग असलेल्या विविध जमीन खरेदी-विक्री व्यवहारांचा तपास करण्यासाठी न्यायिक आयोग स्थापन करण्याची हरयाणातील भाजप सरकारची कृती ही ‘राजकीय सूडबुद्धी’ असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
न्यायिक आयोग स्थापन करण्यामागील उद्देश हा केवळ वड्रा यांना त्रास देणे हा असून त्याला राजकीय वैराचा वास येतो, असे काँग्रेसचे प्रवक्ते राजीव शुक्ला म्हणाले.
यापूर्वी राजस्थान सरकारने केलेल्या चौकशीतही त्यांना वड्रा यांच्याविरुद्ध काही पुरावा सापडला नव्हता. आता हरयाणा सरकारने एका खासगी उद्योजकाच्या व्यवहारांचा तपास करण्यासाठी आयोग स्थापन केला आहे. वड्रा यांचे जमीनविषयक व्यवहार न्यायालयीन तपासाच्या कक्षेत येत नाहीत. याप्रकरणी संपूर्ण पक्ष वड्रा यांच्या मागे उभा आहे, असे शुक्ला यांनी सांगितले.