News Flash

अमेरिकेच्या संकुचित व्यापार धोरणांचा ‘जी ७’ अर्थमंत्र्यांकडून निषेध

जी ७ देशांच्या अर्थमंत्र्यांची अमेरिकी मित्र देशांबरोबर जी बैठक झाली

जी ७ देशांच्या अर्थमंत्र्यांची अमेरिकी मित्र देशांबरोबर जी बैठक झाली त्यात अमेरिकेच्या आक्रमक व संकुचित व्यापार धोरणांचा निषेध करण्यात आला असून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही धातूंवर लादण्यात आलेला वाढीव आयात कर मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे, या सगळ्या घडामोडीत आता आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेला वेगळे पाडण्यात जी ७ देशांना यश येत आहे. अर्थमंत्र्यांच्या परिषदेत या मुद्दय़ावर तोडगा निघालेला नाही त्यामुळे कॅनडातील क्युबेक येथे पुढील आठवडय़ात होणाऱ्या जी ७ देशांच्या बैठकीत अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कठोर टीकेचा सामना करावा लागणार आहे. जागतिक अर्थव्यवस्था ही आता व्यापार संघर्षांच्या पातळीवर आहे. ब्रिटिश कोलंबियात व्हँकुव्हरच्या उत्तरेला एका हिमाच्छादित पर्वतराजीतील रिसॉर्टवर अर्थमंत्र्यांची बैठक झाली त्यात अमेरिकी अर्थमंत्री स्टीव्हन नुशिन हे वेगळे पडले. अमेरिकेच्या प्रमुख व्यापारी भागीदारांनी ट्रम्प यांच्यावर चौफेर टीका केली. या देशांनी अमेरिकेच्या आडमुठय़ा व्यापारी धोरणाचा मुकाबला करून त्याला कायदेशीर आव्हान देण्याचे जाहीर केले आहे. जी ७ देशांच्या अर्थमंत्र्यांनी व बँकिंग क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी अमेरिकेवर जोरदार टीका केली. नुशिन यांनी अमेरिकेवरील टीका फार गांभीर्याने न घेता अमेरिका जी ७ प्रक्रियेला बांधील असल्याचे सांगितले. कॅनडाचे अर्थमंत्री बिल मोरन्यू यांनी सांगितले की, यजमान सरकार व इतर पाच देशांनी व्यक्त केलेली चिंता अमेरिकी अध्यक्षांपर्यंत पोहोचवावी. अमेरिकेच्या व्यापारविषयक कृती सकारात्मक नसून त्यामुळे जी ७ देशांना चिंता वाटते. फ्रान्सचे अर्थमंत्री ब्रुनो ल माइर यांनी सांगितले की,अमेरिकी प्रशासनाने आताच्या परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची अपेक्षा आहे. व्यापार युद्ध टाळणे हे त्यांच्याच हातात आहे.

येत्या काही दिवसात अमेरिका काय निर्णय घेते यावर बरेच काही अवलंबून आहे. अमेरिकेने लादलेले आयात कर हा ट्रान्सअ‍ॅटलांटिक भागात  सर्वात  गंभीर प्रश्न असल्याचे जर्मनीचे अर्थमंत्री ओलाफ  सोल्झ यांनी सांगितले.

ट्रम्प यांच्या धोरणांचा निषेध म्हणून या बैठकीनंतर कुठलेही संयुक्त निवेदन प्रसिद्धीस देण्यात आले नाही.  दरम्यान ही बैठक संपल्यानंतर भांडखोर ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिकी वस्तूंवर इतर देश जास्त कर लादतात या खोडसाळ व्यापार पद्धतीला आम्ही प्रत्युत्तर देत आहोत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2018 12:57 am

Web Title: g7 ministers criticise us tariffs and warn of trade war
Next Stories
1 नील ध्वज मानक प्रकल्पात चिवला व भोगवे बंदरांचा समावेश
2 पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन दुर्दैवी- मेहबूबा मुफ्ती
3 ‘बंगालमधील भाजप कार्यकर्त्यांची हत्या नव्हे, आत्महत्या’
Just Now!
X