‘वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिटय़ूड’, ‘लव्ह इन द टाइम ऑफ कॉलरा’ यासारख्या पुस्तकांतून लॅटिन अमेरिकेतील जनतेच्या दैनंदिन जीवनातील व्यथा मांडणारे, लॅटिन अमेरिकेतील साहित्य चळवळीचे प्रणेते व नोबेल पारितोषिक विजेते स्पॅनिश लेखक गॅब्रिएल गार्सिया मार्क्वेझ (८७) यांचे गुरुवारी दुपारी येथे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते न्यूमोनियाने त्रस्त होते.  मार्क्वेझ यांच्या निधनानिमित्त कोलंबियात तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
आपल्या लेखणीतून सातत्याने जादुई वास्तववादाचा पुरस्कार करणारे माक्र्वेझ लॅटिन अमेरिकेतील विशेषत: त्यांची जन्म व कर्मभूमी असलेल्या कोलंबियातील साहित्य चळवळीचे प्रणेते ठरले होते. त्यांच्या ‘वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिटय़ूड’ या पुस्तकाने तर जगभरातील तरुणांना अक्षरश: वेड लावले होते. या पुस्तकाच्या जगभरात तब्बल तीन कोटी प्रती विकल्या गेल्या, तर ३५ भाषांमध्ये त्याचा अनुवाद झाला. लॅटिन अमेरिकन समाजातील प्रेम, परंपरेनुसार जोपासल्या गेलेल्या अंधश्रद्धा, हिंसाचार, सामाजिक विषमता यांचे प्रतिबिंब माक्र्वेझ  यांच्या लेखनातून उमटत असे. त्यांच्या अनेक कादंबऱ्या व लघुकथा जगभरात आवडीने वाचल्या गेल्या. त्यांच्या या साहित्याची दखल घेत १९८२ मध्ये माक्र्वेझ यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

अल्पपरिचय
आपल्या लेखणीने जगभरातील तरुणांना जादुई वास्तववादाचा मंत्र देणारे स्पॅनिश लेखक गॅब्रिएल गार्सिया मार्क्वेझ यांचा अल्पपरिचय..
*  जन्म : ६ मार्च १९२७
*  जन्मगाव : अर्काटका, कोलंबियाच्या कॅरेबियन बेटांवरील गाव
*  शालेय व महाविद्यालयीन शिक्षणानंतर कोलंबिया विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी
*  १९४७ मध्ये पहिली लघुकथा एल एस्पेक्टॅडोरमध्ये प्रकाशित झाली
*  त्यानंतर विविध वृत्तपत्रांतून पत्रकारिता
*  लेखनामुळे कोलंबियातील तत्कालीन लष्करी राजवटीची नाराजी ओढवून घेतली
*  त्यानंतर जीनिव्हा, रोम, पॅरिस येथे वास्तव्य
*  १९६१ मध्ये ‘नो वन राइट्स टू द कर्नल’ या पुस्तकाचे लेखन
*  १९६७ मध्ये ‘वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिटय़ूड’ कादंबरीचे लेखन
*  कादंबरी जगभरात तुफान लोकप्रिय ठरली
*  १९७५ मध्ये ‘ऑटम ऑफ पॅट्रिआर्च’ कादंबरी
*  १९८२ मध्ये नोबेल पुरस्कार
* १९८५ मध्ये ‘लव्ह इन द टाइम ऑफ कॉलरा’ कादंबरीची निर्मिती
* २००४ मध्ये ‘मेमरीज ऑफ माय मेलँकोली व्होअर्स’ ही अखेरची कादंबरी प्रसिद्ध

एक द्रष्टा लेखक काळाच्या पडद्याआड गेला आहे. मात्र, मार्क्वेझ त्यांच्या साहित्यरूपाने आपल्यात राहतील ही समाधानाची बाब.
बराक ओबामा, अमेरिकेचे अध्यक्ष

कोलंबियाचे सार्वकालिक लोकप्रिय असलेल्या या लेखकाच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
जुआन सँटोस, कोलंबियाचे अध्यक्ष

आमच्या काळातील एक मोठा द्रष्टा लेखक आणि मित्र आज आमच्यात राहिलेला नाही.
फ्रँक्वाइस होलांद, फ्रान्सचे अध्यक्ष

केरळमध्ये लोकप्रिय
केरळमध्ये मार्क्वेझ प्रचंड लोकप्रिय होते. १९७० पासून त्यांचे प्रत्येक पुस्तक मल्याळी भाषेत अनुवादित होते. त्यांच्या पुस्तकांचा प्रचंड वाचकवर्ग केरळात आहे. एवढा की एकदा शिक्षकांनी शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या लेखकांची नावे लिहायला सांगितली असता अनेकांनी मार्क्वेझ यांचे नाव पहिल्या पाचात लिहिले होते. मार्क्वेझ हे कधीच आम्हाला परके वाटले नाहीत. ते मल्याळी लेखकच आहेत, असेच आम्हाला सातत्याने वाटायचे, अशी प्रतिक्रिया केरळमधील प्रकाशक रवी डी. सी. यांनी व्यक्त केली.