* स्वामी विवेकानंद-दाऊद यांची तुलना केल्याने वादात
* भ्रष्टाचाराच्या आरोपांवर महेश जेठमलानींचा राजीनामा
विदर्भातील शेतकऱ्यांची जमीन बळकावल्याच्या आरोपांमुळे गेल्या काही दिवसांपासून टीकेचे लक्ष्य बनलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी हे आता आपल्या ‘बडबडी’मुळे गोत्यात आले आहेत. मध्य प्रदेशमधील भोपाळ येथे बोलताना ‘स्वामी विवेकानंद आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम यांचा बुद्धय़ांक सारखाच असेल..’ असे वक्तव्य करून गडकरींनी स्वत:वर नवे अरिष्ट ओढवून घेतले. तर दुसरीकडे, गडकरींवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांचे प्रतिध्वनी आता भाजपमधूनही उठू लागले असून पक्षाचे अ‍ॅड. महेश जेठमलानी यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा राजीनामा दिला.
विरोधकांना आयते कोलीत
विशेष प्रतिनिधी ,नवी दिल्ली : स्वामी विवेकानंद यांची अंडरवल्र्ड माफिया दाऊद इब्राहिमशी तुलना करून आधीच भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घेरले गेलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी एक नवे संकट ओढवून घेतले आहे. स्वामी विवेकानंद आणि दाऊद इब्राहिम यांचा बुद्धय़ांक सारखाच असेल, पण विवेकानंदांनी आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग राष्ट्र निर्माणासाठी केला तर दाऊद गुन्हेगारीकडे वळला, असे भोपाळमध्ये एका समारंभात गडकरींनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळात भडका उडाला.
‘मानसशास्त्राच्या भाषेत, वैज्ञानिक भाषेत बोलायचे झाले तर विवेकानंद आणि दाऊद इब्राहिम यांचा बुद्धय़ांक सारखाच होता. पण एका व्यक्तीने गुन्हेगारीच्या क्षेत्रात आपल्या पूर्ण बुद्धिमत्तेचा वापर करून शहेनशहा बनली, तर दुसऱ्या व्यक्तीने समाजासाठी व देशासाठी तत्त्वचिंतन करून आपले जीवन वाहून घेतले,’ असे भोपाळमध्ये आयोजित ओजस्विनी समारंभात बोलताना गडकरी म्हणाले. या विधानाने गडकरींच्या विरोधकांना आयते कोलीत सापडले. भाजपच्या ‘संस्कृती’चे गडकरी हे उत्कृष्ट उदाहरण आहेत. स्वामी विवेकानंद यांची दाऊदशी तुलना करण्यापेक्षा भारताच्या सर्वश्रेष्ठ बुद्धिजीवीचा मोठा अपमान आणखी काय होऊ शकतो, असा सवाल केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री मनीष तिवारी यांनी केला. गडकरींची तुलना कसाबशी केली तर भाजपला कसे वाटेल, असा सवाल जगदंबिका पाल यांनी केला.
विवेकानंद आणि दाऊद यांची आपण कोणतीही तुलना केली नाही. एखाद्या व्यक्तीने आपल्या बुद्धीचा योग्य उपयोग केला तर तो विवेकानंद होतो किंवा गैरवापर केल्यास दाऊद होऊ शकतो, असे आपण बोललो होतो. आपल्या विधानाचा विपर्यास करून ते चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले, अशा शब्दात गडकरी यांनी खंडन केले.    
भाजपची पंचाईत
मुंबई : भ्रष्टाचाराचे आरोप झालेले गडकरी यांच्या नेतृत्वाखालील समितीत काम करण्याची इच्छा नाही, असे सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते राम जेठमलानी यांचे पुत्र महेश जेठमलानी यांनी सोमवारी राष्ट्रीय कार्यकारिणीतून राजीनामा दिला.  याटीकेमुळे पक्षाची भ्रष्टाचारविरोधी मोहीम थंडावली असून भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर काँग्रेसला घेरण्याचे मनसुबेही मावळत चालले आहेत.