इस्त्रोच्या मिशन गगनयानला केंद्र सरकारचा हिरवा कंदिल मिळाला असून लवकरच भारतीय अंतराळवीर या मोहिमेला सुरुवात करणार आहेत. या मोहिमेंतर्गत ३ भारतीय अंतराळवीर अवकाशात सात दिवस मुक्काम करणार आहेत. ही मोहीम यशस्वी ठरल्यास अमेरिका, रशिया आणि चीननंतर मानवी अवकाश मोहीम यशस्वी करणारा भारत जगातील चौथा देश ठरणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने १० हजार कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे.

केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. येत्या दिड ते दोन महिन्यात हे मिशन सुरू होणार आहे. जगातील इतर देशही सॅटेलाइट लॉन्च करण्यासाटी इस्रोची मदत घेत आहेत. या महत्त्वकांक्षी प्रकल्पासाठी भारताने रशिया आणि फ्रान्सबरोबर करार केला आहे. ही गगनयान मोहीम यशस्वी होण्यासाठी अंतराळात जाणाऱ्या एका व्यक्तीच्या कमीत कमी चाचण्या घेण्यात येणार आहेत. या शिवाय २०२२ पर्यंत गगनयान अंतराळात पाठवणार असल्याचं इस्रोचे प्रमुख सिवन यांनी आधीच सांगितलं आहे. त्याआधी २०२० आणि २०२१ मध्ये दोन मानवरहित यानही अवकाशात पाठवण्यात येणार आहे. १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेची घोषणा केली होती, त्याला आता मूर्त रुप येणार आहे.

या मोहिमेची जबाबदारी एका महिलेच्या हाती सुपूर्द करण्यात येणार असून इस्रोच्या या प्रकल्पाचे नेतृत्व डॉ. व्ही. आर. ललिथंबिका या कंट्रोल रॉकेट इंजिनीयर करणार आहेत. त्या गेल्या ३० वर्षांपासून इस्रोमध्ये काम करीत आहेत. गगनयान मोहिमेअंतर्गत पाठविण्यात येणार अवकाशयान चार ते पाच टन वजनाचे असेल, अपेक्षित आहे, या प्रकल्पामध्ये विविध संघटना, तज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील मंडळी सहभागी असतील. या प्रकल्पामुळे रोजगारनिर्मिती होणार असल्याचेही बोलले जात आहे.