भारतीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू महेंद्रसिंह धोनी आणि गौतम गंभीर हे दोघे आगामी २०१९ची लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. एका वृत्तातून ही शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाकडून त्यांना तिकीट मिळू शकते असेही या वृत्तात सांगण्यात आले आहे. त्यामुळे गंभीरला दिल्लीतून तर धोनीला झारखंडमधून तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

गौतम गंभीरचे नाव यापूर्वी भाजपासोबत चर्चेत होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीसाठी तो भाजपामध्ये प्रवेश करु शकतो. भाजपा दिल्लीच्या खासदार मिनाक्षी लेखी यांना हटवून गंभीरला संधी देऊ शकते. कारण लेखी यांच्या कामाबाबत भाजपाचे पक्षश्रेष्ठी समाधानी नाहीत. त्यामुळे त्यांच्या जागी गंभीरला संधी देऊन २०१९च्या निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून जनतेसमोर आणले जाऊ शकते.

मिनाक्षी लेखी यांच्या कामावर तसेच त्यांच्या पक्ष नेतेपदावर मतदारसंघातील लोक नाराज आहेत. त्यामुळे भाजपाचे उमेदवार म्हणून दिल्लीतील मतदारसंघातून त्यांना पुन्हा संधी मिळणार नाही. मात्र, याच जागेसाठी गौतम गंभीर हा भाजपासाठी सर्वाधिक चर्चेत राहणारा उमेदवार ठरेल. गंभीरला सर्वांची पसंती मिळू शकते तसेच त्याच्या सामाजिक कार्यासाठी देखील तो जनमानसांत ओळखला जातो. तो स्वतः दिल्लीकर असल्याने आपल्या लोकांसाठी तो चांगले काम करु शकतो, असे एका वरिष्ठ भाजपा नेत्याने संडे गार्डिअनशी बोलताना सांगितले.

त्याचबरोबर टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीशीही भाजपाची बोलणी सुरु आहे. याद्वारे भाजपा या दोन्ही स्टार खेळाडूंच्या करिश्म्याचा फायदा उचलण्याच्या प्रयत्नात आहे. संपूर्ण देशभरात त्यांना घेऊन भाजपा प्रचार मोहिमा राबवू शकते. हे दोघेही त्यांच्या राज्यांपुरतेच नव्हे तर देशाचेही प्रतिनिधित्व करतात. धोनी सध्या आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार आहे त्यामुळे दक्षिणेतही त्याचा चाहता वर्ग आहे.