कुख्यात गँगस्टर मुन्ना बजरंगीच्या हत्येनंतर आता त्याचा चौकशी अहवाल इंडिया टुडेच्या हाती लागली आहे. दिल्ली पोलिसांनी त्याचा हा चौकशी अहवाल तयार केला होता. मुन्ना बजरंगीला २००९ साली मुंबईत अटक झाली होती. चौकशीमध्ये बजरंगीने अनेक खळबळजनक खुलासे केले होते. वयाच्या १४ व्या वर्षी बजरंगीला कुटुंबाने पसंत केलेल्या मुलीबरोबर लग्न करावे लागले. त्याने हा विवाह जबरदस्तीने केला होता.

लग्नानंतर चार ते पाच दिवसांनी त्याच्या काकांचा भुलन सिंह नावाच्या व्यक्तीबरोबर वाद झाला. भुलन बजरंगीच्या गावचा रहिवाशी होता. भुलनने बजरंगीच्या काकांना शिवीगाळ केल्यानंतर संतप्त झालेल्या मुन्ना बजरंगीने २५० रुपयात पिस्तुल विकत घेतले व त्याच बंदुकीने भुलन सिंह यांची गोळया घालून हत्या केली. हा बजरंगीच्या आयुष्यातील पहिला गुन्हा होता.

प्रेम प्रकाश सिंह हे त्याचे खरे नाव होते पण ते नाव लावणे त्याने बंद केले. त्यानंतर मुन्ना बजरंगी आमदार मुख्तार अन्सारीच्या संपर्कात आला व खऱ्या अर्थाने गुन्हे जगतात त्याचा प्रवेश झाला. अन्सारीच्या सांगण्यावरुन त्याने अनेकांची हत्या केली. अन्सारीने बजरंगीला भरपूर पाठिंबा दिला. गँगवॉरमध्ये एकदा बजरंगी जखमी झाला होता. त्यावेळी सुद्धा अन्सारीने त्याला वाचवले होते. जानेवारी १९९६ मध्ये बजरंगीने जमालपूरमध्ये स्थानिक राजकारणी कैलाश दुबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची हत्या केली. हे सर्व गुन्हे करत असताना बजरंगीवर मुख्तार अन्सारीचा राजकीय वरदहस्त होता.

१९९८ साली मुन्ना बजरंगी सीमा सिंह नावाच्या महिलेच्या प्रेमात पडला. एका सार्वजनिक कार्यक्रमात दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर मुन्नाने तिच्याबरोबर लग्न करुन संसार थाटला. त्याचवर्षी दिल्लीमध्ये बजरंगी आणि त्याच्या साथीदाराची पोलिसांबरोबर चकमक झाली. बजरंगी त्याच्या गाडीमध्ये असताना पोलिसांनी त्याच्यावर हल्ला केला. उत्तर प्रदेश पोलीस आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने बजरंगीला चारही बाजूने घेरले होते. यावेळी झालेल्या गोळीबारात बजरंगी ठार झाल्याचा दावा पोलिसांनी केला. पण जेव्हा त्याला रुग्णालयात नेले त्यावेळी तो जिवंत असल्याचे लक्षात आले.

त्यानंतर काही दिवसांनी बजरंगीची पत्नी सीमा सिंहने एका गोंडस मुलीला जन्म दिला. २००२ पर्यंत बजरंगी तिहार तुरुंगात होता. तो तुरुंगातून सुटल्यानंतर मुख्यात अन्सारीने मुंबईमध्ये त्याच्या राहण्याची व्यवस्था केली. २००५ साली मुख्तार अन्सारीने त्याला भाजपा आमदार कृष्णानंद राय यांच्या हत्येसाठी गाझीपूर येथे बोलवून घेतले. या हत्येसाठी तीन एके-४७, तीन एसएलआर आणि एका एसयुव्हीची व्यवस्था करण्यात आली. बजरंगीच्या शूटरने कृष्णानंद राय यांच्यासह एकूण सात जणांची हत्या केली. या हत्याकांडानंतर राजकीय दबाव मोठया प्रमाणात वाढला. अन्सारीची वाराणसी, आझमगड, मऊ, गाझीपूर आणि जौनपूर या भागांवरील पकड सैल झाली. पोलिसांच्या मोस्ट वाँटेड लिस्टमध्ये बजरंगीचा समावेश झाला.

गुन्हेगारी जगतात वेगवेगळया कारवाया करत असतानाच त्याने मोठया प्रमाणावर मायाही जमवली. २५० रुपयांची पिस्तुल विकत घेऊन वयाच्या १४ व्या वर्षी गुन्हेगारी जगतात प्रवेश करणाऱ्या मुन्ना बजरंगीने मृत्यूपर्यंत २५० कोटींचे साम्राज्य उभे केले होते.