महात्मा गांधी यांच्या वस्तूंचा लिलाव या महिनाअखेरीस इंग्लंडमध्ये होत असून या वस्तू लिलावात विकण्यास आपला विरोध आहे, असे गांधीवादी नेते व लेखक गिरिराज किशोर यांनी म्हटले आहे. या वस्तू राष्ट्रीय ठेवा असून हा लिलाव रोखण्यासाठी आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.
पद्मश्री किशोर यांनी आरोप केला, की सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या वस्तूंचा लिलाव रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे गांधीजींच्या वस्तूंच्या लिलावासंदर्भात वर्षभरापूर्वी आवाज उठवण्यात आला होता. किशोर यांनी जुलै २०१२ मध्ये काँग्रेस अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की महात्माजींसह ऐतिहासिक महत्त्वाच्या व्यक्तींच्या वस्तूंच्या लिलावाबाबत सांस्कृतिक मंत्रालयाने धोरण ठरवावे.
 या पत्रानंतर नऊ महिने उलटूनही त्यावर काहीच कृती करण्यात आली नाही. त्यामुळे आपण सोनिया गांधी यांना परत पत्र पाठवणार आहोत असे किशोर यांनी सांगितले. येत्या २१ मे रोजी गांधीजींच्या वस्तूंचा लिलाव लंडन येथे होत आहे. गांधीजींचे इच्छापत्र, १९२१ मधील त्यांचे अधिकारपत्र, अनेक महत्त्वाची पत्रे, त्यांचा कप, हस्तिदंतात कोरलेली तीन शहाणी माकडे अशा वस्तूंचा लिलाव यात होणार आहे. जुलै १९२४ मध्ये गांधीजी जुहू येथे आजारातून सावरत असतानाच्या त्यांच्या वस्तूंचाही त्यात समावेश असून त्या वेळी त्यांनी वापरलेली व स्वत: तयार केलेली शाल, बेडशीट, १९३७ मधील त्यांचे पत्र, गांधीजींची दोन स्वाक्षरी केलेली छायाचित्रे यात आहेत.