जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाने पीडीपीचा पाठिंबा काढला आणि तेथील सरकार कोसळले. ही संधी साधत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला होता. दरम्यान, केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी प्रत्युत्तर देत राहुल गांधीं यांनाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीय आणि काँग्रेसलाच लक्ष्य केले. काश्मीर समस्या ही नेहरूंची देणगी असून तिथे आतापर्यंत लाखो लोक बेघर झाले आहेत. या सर्वांसाठी तुमचा पक्ष आणि कुटुंबच जबाबदार आहे आणि उलट तुम्ही भाजपाकडे कसं बोट करत आहात, अशा सवाल उपस्थित केला आहे.

सरदार पटेल यांनी देशातील सर्व संस्थानांचा प्रश्न सोडवला. पण नेहरूंनी काश्मीरची जबाबदारी घेतली आणि ती आणखी जटील करून ठेवली. काश्मीरची समस्या ही नेहरूंची देणगी आहे. तेथे हजारो लोकांची हत्या करण्यात आली. काश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आली तर १ लाख ६० हजाराहून अधिक जण बेघर झाले. या सर्वांसाठी तुमचा पक्ष आणि कुटुंबीय जबाबदार आहेत. उलट तुम्ही भाजपाकडे बोट करत आहात, असा सवाल उपस्थित केला.

तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी भाजपा-पीडीपी हे संधीसाधू आहेत अशी टीका करत त्यांच्या या युतीने जम्मू-काश्मीरला आगीत ढकलून दिल्याचा आरोप केला. राज्यात आमच्या धाडसी जवानांशिवाय अनेक लोकांचा जीव गेला आहे. यूपीएच्या काळात करण्यात आलेल्या सर्व प्रयत्नांवर पाणी फेरले गेले आहे. राज्यपाल राजवटीच्या माध्यमातून हे नुकसान सुरूच ठेवण्यात येत आहे. अक्षमता, अहंकार आणि घृणा नेहमी अपयशी ठरते, अशा शब्दांत त्यांनी ट्विट केले होते.

दरम्यान, मेहबूबा मुफ्ती सरकार कोसळल्यानंतर बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यात राज्यपाल राजवट लागू करण्यास मंजुरी दिली. भाजपाने मंगळवारी दुपारी राज्य सरकारचे समर्थन काढल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांनीही आपला राजीनामा राज्यपाल एन एन व्होरा यांच्याकडे सोपवला होता.