तीन पिढय़ा अमेठी मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गांधी घराण्याने इथला विकास केला नाही. इतक्या वर्षांत येथे त्यांनी साधा रेल्वेमार्ग टाकला नाही, अशी टीका मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी केली.गांधी घराणे गेल्या तीन पिढय़ांपासून अमेठीमध्ये रेल्वेमार्ग टाकण्याचे आश्वासन देत आल्या आहेत, परंतु हे आश्वासन हवेतच विरले. गेल्या रेल्वे अर्थसंकल्पात सुलतानपूर ते अमेठी रेल्वेमार्ग टाकण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली असल्याचे सांगताना मला अभिमान वाटतो. ही तरतूद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच झाली असल्याचे त्या म्हणाल्या. जोवर अमेठी काँग्रेसमुक्त होत नाही, तोपर्यंत या मतदारसंघाचा विकास अशक्य आहे, असे इराणी यांनी सांगितले. अमेठीतील सम्राट सायकल कारखान्यासाठी दिलेली दिलेली ६५ एकरची जागा राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टने शेतकऱ्यांकडून कवडीमोलाने विकत घेतली, मात्र कुणालाही नोकरी मिळाली नाही, असा आरोप इराणी यांनी केला.