कर्नाटक उच्च न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान महात्मा गांधीचा पुतळा म्हणजे काही पुजेची जागा नाही असं स्पष्ट केलं आहे. न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या एका प्रकरणामध्ये एम. जी. रोडवर (महात्मा गांधी मार्ग) दारुचं दुकान सुरु करण्यासाठी देण्यात आलेले परवाने रद्द करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. बेंगळुरुमधील वकील ए. वी. अमरनाथ यांनी न्यायालयामध्ये दाखल केलेल्या जनहित याचिकेमध्ये जे दारुचं दुकान सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे तिथून अवघ्या ३० मीटर अंतरावर महात्मा गांधीचा पुतळा असल्याचे म्हटले होते. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावत दारुविक्रेत्याला दिलासा दिला आहे.

अमरनाथ यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये कर्नाटक एक्साइज लायसन्स (जनरल कंडिशन) रुल्स १९६७ मधील नियम ३(३) चा आधार घेत याचिका दाखल केली होती. या नियमानुसार दारुविक्री करणारी दुकाने प्रार्थनास्थळे तसेच इतर धार्मिक स्थळांच्या आजूबाजूला सुरु करण्यास परवानगी देता येत नाही. याच नियमाचा आधार घेत अमरनाथ यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर दरवर्षी अनेक लोक आदर व्यक्त करण्यासाठी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी येतात. त्यामुळे या ठिकाणी दारुविक्रीला परवानगी देऊ नये अशी मागणी केली होती.

सोमवारी या प्रकरणासंदर्भात झालेल्या सुनावणीमध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अभय श्रीनिवास ओका यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली. ‘महात्मा गांधीच्या विचारसरणीनुसार त्यांची पूजा केली जावी असं त्यांनी कधीच म्हटलं नव्हतं,’ असं निरिक्षण नोंदवत ही याचिका न्यायालयाने फेटाळल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

या प्रकरणामध्ये पूर्वी ९ जुलै रोजी न्यायालयाने स्थानिक तहसिलदारांना वादग्रस्त जागेची पहाणी करण्याचे आदेश दिले होते. या ठिकाणी दारुचे दुकान सुरु करण्यासाठी देण्यात आलेला परवाना काही काळांसाठी स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर याचिकाकर्ते आणि दुकानदाराच्या उपस्थितीमध्ये पाहणी करुन न्यायालयासमोर अहवाल सादर करण्यात आला होता. सर्व प्रकरण ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत दुकान सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे.