ब्रिटनमध्ये लिसेस्टर येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी गुंडागर्दी करण्यात आली. १९८४ च्या ऑपरेशन ब्लू स्टारच्या विरोधात हे कृत्य करण्यात आले. नेव्हर फरगेट ८४, वुई वॉन्ट जस्टीस ८४ अशा घोषणा असलेले फलक म.गांधी यांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी लिहिण्यात आले. हे संदेश १९८४ च्या ब्लू स्टारशी संबंधित होते. सुवर्णमंदिरात लष्कराने त्यावेळी कारवाई केली होती. म.गांधी यांच्या पुतळ्याची कथित विटंबना झाल्याच्या घटनेनंतर ही बाब पोलिसांच्या लक्षात आली असून त्यांनी चौकशी सुरू केली. लिसेस्टर व आजूबाजूच्या भागातील शिखांनी लंडन येथे सुवर्णमंदिराला वेढा दिल्याच्या ३० व्या स्मृती दिनानिमित्त मोर्चा काढला होता. कांस्य धातूचा हा पुतळा होता, त्याच्या पायथ्याशी कोरलेला सर्व मजकूर पालिका कर्मचाऱ्यांनी रविवारी सकाळी काढून टाकला. पुतळ्याची मोडतोड गुन्हेगारी स्वरूपाची असून या घटनेबाबत माहिती असणाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.