बिअरच्या कॅन व बाटल्यांवर एका अमेरिकी कंपनीने महात्मा गांधी यांचे छायाचित्र वापरले असून त्याबाबत वादंग निर्माण झाला आहे. महात्मा गांधी यांचे छायाचित्र दारूच्या बाटलीवर वापरण्यास आक्षेप घेणारी याचिका हैदराबाद न्यायालयात दाखल झाली असून त्यात असे म्हटले आहे की, यामुळे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अवमान झाला आहे त्यामुळे दारू उत्पादक कंपनीने दिलगिरी व्यक्त करावी.
कनेक्टीकट येथील न्यू इंग्लंड ब्रुइंग कंपनी या कंपनीचा असा दावा आहे की, महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहण्याचाच आपला हेतू होता. शांतीदूत असलेल्या महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यासाठीच त्यांचे छायाचित्र वापरले आहे.
सायबराबादचे महानगर दंडाधिकारी यांच्यापुढे वकील सुनकारी जनार्दन गौड यांनी याचिका दाखल केली असून गांधीजींचा फोटो दारूच्या बाटलीवर वापरणे आक्षेपार्ह असून त्याबाबत भारतीय कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे. राष्ट्रीय सन्मान कायदा १९७१ व १२४ अ अन्वये हा गुन्हा असल्याचे याचिकेत म्हटले आहे. ही याचिका उद्या सुनावणीसाठी येणार आहे. बियर कंपनीचे प्रमुख व भागीदार मॅट वेस्टफॉल यांनी सांगितले की, भारतीय लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्ही माफी मागतो.

आमची गांधी बोल्ट ही बियर चांगल्या अन्नाबरोबर मित्रांसमवेत सेवन करता येते त्यामुळे महात्मा गांधी यांच्याबाबत व सविनय कायदेभंगासारख्या अहिंसक चळवळींबाबत माहिती घेण्याची प्रेरणा मिळते. अमेरिकी लोकांना श्रद्धांजली वाहण्याचा हा प्रकार भावला आहे. ही बियर विशिष्ट वासाची असून त्याने आत्मशुद्धीस मदत होते तसेच  सत्य व प्रेमाचा शोध घेण्यास आपण प्रवृत्त होतो.
 – मॅट वेस्टफॉल, बियर कंपनीचे प्रमुख व भागीदार