महात्मा गांधी यांच्या काही व्यक्तिगत कागदपत्रांचा येथील लुडलो शहरात लिलाव होणार आहे.
महात्माजींनी स्वत: चरख्यावर सूत कातून त्यापासून विणलेली आणि वापरलेली शाल, त्यांची चादर, काटा-चमचा यांसहित गांधीजी वापरायचे तो बाऊल, त्यांची कप-बशी आणि त्यांची हस्तिदंतामध्ये कोरलेली ‘तीन माकडे’ आदी साहित्याचाही लिलावात समावेश आहे.
इंग्लंडमधील लुडलो रेसकोर्स येथे येत्या २१ मे रोजी या वस्तूंबरोबरच, गांधीजींचे १९२१ साली केलेले मृत्युपत्र आणि काही पत्रांचा तसेच गांधीजींनी स्वत: स्वाक्षरी केलेल्या दुर्मीळ छायाचित्रांचा समावेश आहे.
या लिलावामध्ये भारत आणि भारतातील पंजाब राज्य यांच्याशी संबंधित महत्त्वाच्या कागदपत्रांचा समावेश आहे. या कागदपत्रांमध्ये १० हजारांच्या अफगाण सैन्यावर चालून गेलेल्या २१ शीख सैनिकांच्या युद्धाचे प्रत्यक्ष वर्णन करणारे एका सैनिकाचे पत्र तसेच, महाराजा दुलीप सिंग यांच्या इंग्लंडचे राजे एडवर्ड सातवे यांच्यासह काढलेल्या छायाचित्रांचा समावेश आहे.