News Flash

गणपतीची प्रतिमा असलेली नाणी; संग्राहकांना पर्वणी

गणपतीची प्रतिमा असलेले पहिले चलनी नाणे जर्मनीत तयार करण्यात आले असून ते पश्चिम आफ्रिकेतील आयव्हरी कोस्ट या देशाच्या सरकारने जारी केले आहे. ही नाणी भारतातील

| July 8, 2013 06:04 am

गणपतीची प्रतिमा असलेले पहिले चलनी नाणे जर्मनीत तयार करण्यात आले असून ते पश्चिम आफ्रिकेतील आयव्हरी कोस्ट या देशाच्या सरकारने जारी केले आहे. ही नाणी भारतातील नाणेसंग्राहकांना खरेदी करता येणार आहेत.
जर्मनीच्या मेयर टांकसाळीने शुद्ध चांदीत ही नाणी तयार केली असून त्यात पिंपळाच्या पानावर गणेशाची रंगीत प्रतिमा आहे. ‘वक्रतुंड महाकाय’ हा संस्कृत श्लोकही त्यात कोरलेला आहे. ही नाणी विशेष करून संग्राहकांसाठी आहेत. प्रत्येक नाण्याचे वजन हे २५ ग्रॅम असून त्याला स्वारोव्हस्की स्फटिकही लावलेले आहेत. प्रत्येक नाण्याची किंमत रु. ८००१ इतकी असून ही नाणी ९ सप्टेंबरला गणेशचतुर्थीच्या दिवशी  मागणी केलेल्या संकलकांना दिली जाणार आहेत. आतापर्यंत कुठल्याही सरकारने गणपतीची प्रतिमा असलेली नाणी जारी केली नव्हती, त्यामुळे त्यांचे महत्त्व आहे. नाणेतज्ज्ञ आलोक के गोयल यांनी सांगितले, की भारतात गणपतीची प्रतिमा असलेल्या नाण्यांना मोठी मागणी आहे परंतु भारतीय टांकसाळी या धार्मिक व्यक्तिचित्रांवर आधारित नाणी काढत नाहीत. आपल्याकडे गणपतीचे चित्र असलेले नाणी सरकारी पातळीवर काढण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रत्यक्ष वापर न केले जाणारे पण चलनी नाणे असलेले हे नाणे वेगळेच आहे.
कोलकाता येथील ‘एजी इम्पेक्स’ या आस्थापनाला या नाण्यांची विक्री करण्याचे आंतरराष्ट्रीय अधिकार मिळाले असून आजपासून त्यांनी या नाण्यांसाठी ऑर्डर्स घेण्यास सुरुवात केली आहे.
या नाण्यांना खास पेटी असेल. तिचा आकार गणपतीचे वाहन असलेल्या उंदरासारखा असेल. आयव्हरी कोस्टचे प्रतीकचिन्ह असलेले हत्तीचे मुख एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला गणेशाची प्रतिमा असेल, त्यामुळे हे नाणे  वेगळे आहे, असे गोयल यांचे मत आहे.
गोयल हे सॉफ्टवेअर अभियंता असून त्यांनी सार्क देशातील वेगळ्या नाण्यांच्या विक्रीसाठी ‘कॉइन इनव्हेस्ट ट्रस्ट’ या युरोपीय कंपनीशी करार केला आहे. गणेशाच्या नाण्यानंतर आता भारताशी संबंधित काही विषयांवर काढण्यात आलेली नाणी आयात करण्याचा त्यांचा विचार आहे. महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावरील नाण्यांची मालिकाच आणण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या संग्रहात पाच हजारपेक्षा जास्त वेगळी नाणी आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2013 6:04 am

Web Title: ganesha coins minted in germany issued from africa
टॅग : Ganesha
Next Stories
1 ओरिसातील जगन्नाथाची रथयात्रा आता फेसबुकवर
2 टू जी घोटाळा: साक्ष देण्यापासून सूट मिळण्यासाठी दयालू अम्मा सुप्रीम कोर्टात
3 पूर्वसूचना मिळूनही सुरक्षा यंत्रणांचे दुर्लक्ष
Just Now!
X