मुंबई व परिसरात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले असतानाच देशाची राजधानी दिल्लीत एका २३ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. शाळेसाठी वापरण्यात येणाऱ्या खासगी बसमध्ये एका टोळक्याने या तरुणीवर बलात्कार करून तिला चालत्या गाडीतून फेकून दिले. तरुणीवर सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.
मूळची उत्तराखंडची असलेली संबंधित तरुणी दिल्लीत निम-वैद्यकीय शाखेतील शिक्षण घेत आहे. रविवारी रात्री ती आपल्या मित्रासह द्वारका परिसराकडे जाणाऱ्या खासगी बसमध्ये चढली. या गाडीत तरुणी व तिच्या मित्राखेरीज एक टोळके होते. हे टोळके शाळेसाठी वापरल्या जाणाऱ्या त्या बसचेच कर्मचारी होते असे तपासात निष्पन्न झाले आहे.
या टोळक्याने प्रथमत तरुणीची छेड काढली. तरुणीच्या मित्राने हटकले असता त्याला या टोळक्याने जबर मारहाण केली. त्यानंतर तरुणीवर या टोळक्याने सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर दोघांनाही दक्षिण दिल्लीतील महिपालपूर परिसरात फेकून देण्यात आले.
या दोघांनाही जखमी अवस्थेत सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरुणीच्या मित्राला किरकोळ उपचारानंतर सोडण्यात आले. मात्र, तरुणीची प्रकृती चिंताजनक आहे. तरुणीच्या मित्राने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर तपासाची चक्रे फिरली. पोलिसांनी आतापर्यंत चार संशयितांना ताब्यात घेतले असून अन्य दोघांची रेखाचित्रे जारी केली आहेत. बसच्या मालकाचाही शोध जारी आहे.
गंभीर दखल
राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी दिल्लीच्या मुख्यमंत्री शिला दीक्षित यांच्याकडे केली आहे.