सामूहिक बलात्काराच्या घटनेतील पीडित तरुणीसाठी रस्त्यांवर उतरलेल्या लोकांचा रोष आणि संताप ऐकला गेला आहे. देशाच्या लाडक्या मुलीने मृत्युशी दिलेली झुंज व्यर्थ ठरणार नाही आणि आरोपींना सर्वात कठोर शिक्षा मिळून तिला न्याय मिळेल, अशा शब्दात आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी प्रथमच दूरचित्रवाणीच्या माध्यमातून संतप्त जनतेच्या भावनांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला.
आज प्रत्येक भारतीय दुखात आहे कारण त्यांनी आशा आणि स्वप्नांनी भरलेले आयुष्य जगू पाहणाऱ्या आपल्या लाडक्या मुलीला गमावले आहे. आम्ही अंतकरणपूर्वक तिचे मातापिता आणि कुटुंबियांच्या सोबत आहो. संपूर्ण देश त्यांच्या दुखात सहभागी आहे. तिला न्याय मिळेल आणि तिचा लढा व्यर्थ ठरणार नाही. या दुखद घटनेत जनतेने शांतता राखावी, असे आवाहन करताना सोनिया गांधी म्हणाल्या की, या घटनेमुळे देशातील सर्व महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे करण्याच्या मोहीमेत पूर्ण ताकदीनिशी लढण्याचा आमचा निर्धार मजबूत झाला आहे. त्यामुळे भविष्यात अशी दुष्कृत्ये करणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली जाईल. ज्या लोकांनी मृत तरुणीच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरून या घटनेविरुद्ध आपला रोष आणि संताप व्यक्त केला त्यांचा आवाज ऐकला गेला आहे. एक महिला आणि आई असल्यामुळे तुमच्या भावना मी समजू शकते, असे सोनिया गांधी यांनी या निमित्ताने देशवासियांना संबोधित करताना म्हटले आहे.