दिल्लीतील बसमध्ये गेल्या १६ डिसेंबर रोजी युवतीवर बलात्कार झाला, त्यावेळी आपण त्याठिकाणी नव्हतोच, असा दावा या प्रकरणाशी संबधित दोन संशयित आरोपींनी केला आहे. आरोपींच्या या दाव्यामुळे या प्रकरणास वेगळे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश योगेश खन्ना यांच्यासमोर संशयित आरोपी विनय शर्मा याने एक निवेदन सादर केले आहे. ही घटना घडली त्यावेळी आपण स्वत: आणि दुसरा आरोपी पवन गुप्ता त्यावेळी बसमध्येच नव्हतो. आपल्याला या खटल्यामध्ये खोटेपणाने अडकावण्यात आले आहे असे विनयने या निवेदनामध्ये स्पष्ट केले आहे.
 ही घटना घडली, त्यावेळी आपण गुप्तासमवेत दक्षिण दिल्लीतील एका संगीत कार्यक्रमास गेलो होतो आणि तशी मोबाइलची व्हिडिओ क्लीपही पुराव्यासाठी दाखवू, असे विनयच्या वकिलांनी सांगितले. विनयने या व्हिडिओची सीडी बनविण्याची अनुमती मागितली असून त्याद्वारेच तो आणि पवन त्या रात्री संबंधित बसमध्ये नव्हते हे सिद्ध होऊ शकेल, असे वकिलांनी न्यायालयास सांगितले. त्यावर हा मामला संशयित आरोपी आणि बचाव पक्षाचे वकील यांच्यात असल्यामुळे संशयित आरोपी व्हिडिओ क्लीपवरून सीडी तयार करू शकतील परंतु या घटकेस आपल्याला त्याच्याशी काही देणेघेणे नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.