अवघ्या देशाला हादरवून सोडणाऱ्या दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोपी रामसिंह (३५) याने सोमवारी पहाटे तिहार तुरुंगातील कोठडीत आत्महत्या केली. तिहार तुरुंगातील आपल्या कोठडीत स्वत:च्या कपडय़ांचा वापर करून रामसिंहने गळफास लावून घेतला. मात्र, एका हातात व्यंग असलेल्या रामसिंहने गळफास घेणे अशक्य असून हा खून असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे या संपूर्ण घटनेची दंडाधिकारी चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी दिले आहेत.
दिल्लीत धावत्या बसमध्ये झालेल्या सामुदायिक बलात्काराच्या प्रकाराने अख्ख्या देशाला हादरा बसला होता. ज्या बसमध्ये बलात्काराची घटना घडली तिचा रामसिंह चालक होता. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी त्याला अटक करण्यात आली होती. सोमवारीच त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार होते. मात्र, पहाटे पाचच्या सुमारास तुरुंगातील कोठडीत रामसिंह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला.  शवविच्छेदन आणि न्यायवैद्यक अहवाल हाती आल्यानंतरच रामसिंहच्या मृत्यूचे खरे कारण कळू शकेल, असे ‘तिहार’चे प्रवक्ते सुनील गुप्ता यांनी सांगितले. पहाटे साडेतीन ते साडेपाच दरम्यान आत्महत्येचा प्रकार घडला असावा, असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, ‘रामसिंह याने आत्महत्या केली नसून, त्याचा खून करण्यात आला आणि नंतर त्याला फासावर लटकविण्यात आले. हाताला झालेल्या दुखापतीमुळे रामसिंहला त्याचा हात मोकळेपणाने हलविता येत नव्हता. यामुळे त्याने गळफास घेतला हे म्हणणे संशयास्पद वाटते,’ असे रामसिंहच्या वडिलांनी सांगितले.  
बंदोबस्त असूनही..
आत्महत्येच्या शक्यतेमुळे तुरुंगात ठेवलेला विशेष बंदोबस्त आणि कोठडीतील इतर तीन कैदी यांना गुंगारा देत रामसिंह याने केलेल्या आत्महत्येबाबत उलटसुलट चर्चा होत आहे. येथील तीन क्रमांकाच्या कोठडीत त्याने जमिनीपासून आठ फूट उंच असलेल्या ग्रिलला गळफास बांधला. मात्र, त्याची हालचाल कोणाच्याच कशी लक्षात आली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या आत्महत्येचा तपशील देण्यास ‘तिहार’चे महासंचालक विमला मेहरा यांनी नकार दिल्याने या प्रकरणी गूढ आणखी वाढले आहे.