उत्तर प्रदेशातील उन्नाव आणि जम्मू काश्मीरमधील कठुआ येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. आधीच परिस्थिती चिघळली असताना आता अजून एक सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. राजस्थानमधील भरतपूरमध्ये एका अल्पवयीन तरुणीवर तीन तरुणांनी मिळून सामूहिक बलात्कार केला. आरोपी तरुण एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी बलात्कार होत असतानाचा व्हिडीओ शूट करत सोशल मीडियावर व्हायरल करुन टाकला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हलैना पोलीस ठाण्याअंतर्गत ३१ मार्चच्या रात्री पीडित तरुणीचं अपहरण झालं होतं. अपहरण केल्यानंतर पीडित तरुणीला गावाबाहेरील एका दुकानात नेण्यात आलं, जिथे तीन तरुणांनी मिळून तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर आरोपींनी पीडित तरुणीला रस्त्यावर सोडून पळ काढला. पीडित तरुणीने आपल्या नातेवाईकांना सांगितल्यानंतर घटना उघडकीस आली.

पीडित तरुणीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आपला गुन्हा उघडकीस आल्यामुळे आरोपींनी पळ काढला असण्याची शक्यता आहे. पीडित तरुणीच्या वडिलांनी पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे आरोपी अटक होत नसल्याचा आरोप केला आहे. आरोपींच्या फोन लोकेशनच्या सहाय्याने त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं एक पथक उत्तर प्रदेशला रवाना केलं असल्याचंही कळत आहे.

उन्नाव येथे अल्पवयीन तरुणीने भाजपा आमदार कुलदीप सेंगर यांच्यावर सामूहिक बलात्काराचा आरोप केला होता. याप्रकरणी सीबीआयने गुरुवारी रात्री कुलदीप सेंगर यांना अटक केली आहे. दुसरीकडे जम्मू काश्मीरमधील कठुआ येथे आठ वर्षाच्या चिमुरडीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणावरुनही रोष व्यक्त होत आहे.