उत्तर प्रदेशातील मेरठ येथे पोलिसांसमोर मोठा पेच निर्माण झाला जेव्हा एक महिला आपल्यावर झालेल्या सामूहिक बलात्काराचा व्हिडीओ घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली आणि आरोपींना अटक करण्याची मागणी करु लागली. आपल्यावरील सामूहिक बलात्काराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतरही पोलीस काहीच कारवाई करत नसल्याचा महिलेचा आरोप आहे.

पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, 17 फेब्रुवारीला मेरठ येथे तिघांनी मिळून आपल्यावर सामूहिक बलात्कार केला. इतकंच नाही तर बलात्कार होत असतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला. पोलिसांकडे गेल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी महिलेला देण्यात आली होती. यानंतरही महिलेने धैर्य दाखवत पोलिसांकडे धाव घेतली आणि आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली. व्हिडीओ व्हायरल होण्याआधी कारवाई करावी अशी मागणी पीडित महिला करत होती. मात्र पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही.

महिला पोलिसांकडे गेली असल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोपींनी व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला. मंगळवारी महिला सामूहिक बलात्काराचा व्हिडीओ घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली. आरोपी वारंवार आपल्या कुटुंबाला संपवण्याची धमकी देत असल्याचं पीडितेने सांगितललं आहे. जे माझ्यासोबत झालं ते बदललं जाऊ शकत नाही, पण पोलीस किमान व्हिडीओ व्हायरल होण्यापासून रोखू शकत होते असं पीडितेने म्हटलं आहे.

आपण अनेकदा पोलीस ठाण्यात जाऊनही दुर्लक्ष करण्यात आल्याचं पीडित महिलेने सांगितलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 फेब्रुवारीला अनीस अन्सारी, शादाब आणि फरियाद या तिघा आरोपींविरोधात एफआयआर दाखल कऱण्यात आला होता. पण पीडित महिलेच्या इच्छेनुसार प्रकरण क्राइम ब्रांचकडे सोपवण्यात आलं होतं. एसपी अविनाश पांडे यांनी आपण याप्रकरणी लवकरात लवकर कारवाई करत आरोपींना अटक करण्याचे आदेश दिल्याची माहिती दिली आहे.