त्या दोघींचा रंग गोरा असल्यामुळे इतर ३० जणींमधून त्यांची निवड झाली होती. निवडीनंतर मध्यस्थाने त्यांना थेट सौदी अरेबियाच्या मुत्सद्द्याला विकले. या मुत्सद्द्याने त्या दोघींना जेद्दाहला नेले आणि तेथून परत त्यांना गुरगावमध्ये आणण्यात आले. तिथल्याच सदनिकेमध्ये या दोघींवर गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या लोकांकडून बलात्कार करण्यात आला, अशी माहिती तपासात पुढे आली आहे.
सौदी अरेबियातील मुत्सद्द्याकडून गुरगावमध्ये दोन महिलांवर करण्यात आलेल्या शारीरिक अत्याचाराच्या प्रकरणात रोज नवनवीन माहिती पुढे येते आहे. या महिलांवर मुत्सद्द्याकडून आणि त्याच्याकडे आलेल्या पाहुण्यांकडून वारंवार बलात्कार करण्यात आला. सामूहिक बलात्कार आणि दोन महिलांना डांबून ठेवल्याप्रकरणी या मुत्सद्दय़ाविरुद्ध मंगळवारी रात्री दिल्ली पोलीसांनी गुन्हा नोंदविला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पीडित महिला नेपाळमधून कामाच्या शोधात आणि पैसे कमाविण्यासाठी भारतात आल्या होत्या. त्यापैकी एक महिला घटस्फोटित असून, दुसऱया महिलेचे घर नेपाळमध्ये झालेल्या भूकंपात उदध्वस्त झाले. या दोघीही कामाच्या शोधात दिल्लीत आल्यावर त्यांना अन्वर नावाचा एक मध्यस्थ भेटला. त्याने त्या दोघींना सौदी अरेबियाच्या मुत्सद्द्याला विकले. त्यांचा रंग गोरा असल्यामुळे त्यांची यासाठी निवड करण्यात आली. नेपाळ आणि उत्तराखंडमधून महिलांना आणून त्यान गुरगावमधील उच्चपदस्थ लोकांना विकणे हाच अन्वरचा धंदा. ज्या महिला रंगाने गोऱया आहेत त्यांची परदेशामध्ये विक्री केली जायची आणि ज्या दिसायला बेताच्याच आहेत त्यांना दिल्लीमध्ये मोलकरीण म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी कामाला ठेवले जायचे.
पीडित महिलांना विकण्यापूर्वी त्यांना महिन्याला ३० हजार रुपये पगार दिला जाईल, असे आश्वासनही देण्यात आले होते. या दोन्ही महिला अन्वरकडे येण्याअगोदर त्यांची नेपाळमध्ये कल्पना नावाच्या एक महिलेशीही ओळख झाली होती, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. पैसे कमविण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलांना हेरून त्यांना भारतात पाठविण्याचे काम कल्पनाकडून केले जाते. तिने आतापर्यंत २८ महिलांना भारतात आणले आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.