येथील एका धावत्या बसमध्ये गेल्या रविवारी सामूहिक बलात्काराला बळी पडलेल्या २३ वर्षीय तरुणीची प्रकृती खालावल्याची माहिती डॉक्टरांनी सोमवारी दिली. तिची प्रकृती स्थिर आहे, मात्र रक्तातील जंतुसंसर्गामुळे तिच्या प्रकृतिला असलेला धोका अद्याप टळला नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या तरुणीवर सफदरजंग हॉस्पिटलमध्ये उपचार होत आहेत. दैनंदिन वैद्यकीय अहवालाचा आढावा घेतल्यानंतर तिच्या ओटीपोटात खूप पाणी जमा झाल्याचे लक्षात आले, यानंतर डॉक्टरांनी रविवारी तिच्यावर छोटी शस्त्रक्रिया केली. याशिवाय तिला जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले आहे. तिच्या रक्तातील प्लेटलेट्सचे प्रमाण खूपच खालावले असून ते १९ हजापर्यंत घसरले आहे. (किमान दीड लाख ते कमाल साडेचार लाख प्लेटलेट्स हे सुदृढ माणसाच्या शरीरातील सरासरी प्रमाण मानले जाते.) या तरुणीची मानसिक स्थिती उत्तम आहे, परंतु तिला ताप आहे, रक्तातील जंतुसंसर्गामुळे तिचे अवयव निकामी होण्याची भीती आहे आणि त्यामुळेच तिच्या जिवालाही धोका आहे, असे डॉक्टर म्हणाले.

वडिलांचे आवाहन
माझ्या मुलीची प्रकृती आता काहीशी स्थिर आहे, तिच्या समर्थकांनी कायदा हातात घेऊन अशांतता निर्माण करू नये, या प्रकरणातील सर्व गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांना कृपया सहकार्य करावे, असे आवाहन तिच्या वडिलांनी सोमवारी केले.