कुख्यात गँगस्टर राजेश भारती पोलीस चकमकीत ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकासोबत शनिवारी राजेश भारतीची चकमक झाली. याच चकमकीत तो ठार झाला. राजेश भारतीवर धमकी देऊन पैसे वसुली करणे, खंडणी मागणे असे गुन्हे त्याच्यावर दाखल होते. त्याच्यावर पोलिसांनी १ लाखाचे इनामही जाहीर केले होते. राजेश भारतीकडे एके-४७ रायफल आहे अशीही माहिती पोलिसांना मिळाली होती.

फक्त राजेश भारतीच नाही एकूण चार गुन्हेगारांना ठार करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. भूषण नावाच्या एका बुकीला राजेश भारती ५० लाखांची खंडणी मागत होता अशी ऑडियो टेपही समोर आली होती. मला ५० लाख रुपये दिले नाहीस तर तुला जीवे मारीन अशी धमकी त्याने या बुकीला दिली होती असेही समोर आले आहे. तू मला ५० लाख रुपये दिले नाहीस तर तुला जगातले कोणतेही पोलीस वाचवू शकणार नाही असेही राजेश भारतीने भूषण नावाच्या बुकीला धमकावले होते.

मागील २३ वर्षांपासून राजेश भारती गुन्हेगारी विश्वात वावर होता. भूषण नावाच्या बुकीला धमकी देताना पैसे दिले नाहीस तर एके ४७ ने तुझ्यावर गोळीबार करेन अशीही धमकी त्याने दिली होती.
दक्षिण दिल्ली या ठिकाणी याच कुख्यात गँगस्टरसोबत पोलिसांची चकमक उडाली. पोलीस अधिकारी प्रमोद सिंह कुशवाहा यांनी या चकमकीत राजेश भारतीसह एकूण चारजण मारले गेल्याची माहिती दिली. या चकमकीत ८ पोलीसही जखमी झाले. ८ पैकी ६ पोलीस कर्मचाऱ्यांना गोळी लागली आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. राजेश भारती हा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार होता. त्याच्या विरोधात अनेक गंभीर प्रकरणे दाखल करण्यात आली होती. हरयाणा पोलिसांच्या तावडीतून तो पळाला होता. त्यानंतर त्याचा शोध सुरुच होता अखेर त्याला आज ठार करण्यात आले आहे.