उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या कुख्यात गुंड विकास दुबे याला ठार करण्यात आलं. विकास दुबेला अटक केल्यानंतर विशेष पथक त्याला घेऊन कानपूरला चाललं होतं. यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनचा अपघात झाला. यानंतर विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. विकास दुबे याने पोलिसांचं शस्त्र घेऊन गोळीबार करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी विकास दुबेला आत्मसमर्पण करण्यास सांगितलं. यादरम्यान झालेल्या चकमकीत पोलिसांनी विकास दुबेला ठार केलं. त्यानंतर शुक्रवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी “परिणामी हाती बंदूकही घेईन,” अशी तीव्र प्रतिक्रिया विकास दुबेच्या पत्नी देण्यात आली.

दरम्यान, यावेळी विकास दुबे याच्या पत्नीनं माध्यमांनी राजकारण केल्याचा आरोप केला. “ज्यानं चूक केली त्याला शिक्षा मिळणार, हे मी सांगत आहे. गरज पडल्यास हाती बंदूकही घेईन,” अशी प्रतिक्रिया त्याच्या पत्नीनं दिली. तसंच त्या ठिकाणी आलेल्या माध्यमांच्या लोकांवर तिनं संताप व्यक्त केला. “आपल्या पतीनं चूक केली होती आणि पोलिसांनी जे काही केलं ते योग्यच केलं,” असंही ती यावेळी म्हणाली.

पोलिसांनी रुग्णालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, विकास दुबे याने अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर झालेल्या चकमकीत विकास दुबे जखमी झाला होता. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी त्याचा मृत्यू झाला. या चकमकीत दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले होते. कुख्यात गुंड विकास दुबेला गुरुवारी पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. मध्य प्रदेशातील उज्जैन येथे विकास दुबेला अटक करण्यात आली होती. गेल्या आठवड्यापासून पोलीस विकास दुबेचा शोध घेत होते. त्याच्यावर पाच लाखांचं बक्षीसदेखील जाहीर करण्यात आलं होतं. अनेक नाट्यमय घडामोडींनंतर अखेर विकास दुबे पोलिसांच्या हाती लागला होता.