26 February 2021

News Flash

जीना नहीं, गन्ना.

कैरानाचे भाजपचे गुज्जर खासदार हुकूम सिंह यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक घेण्यात आली.

कैराना लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या राष्ट्रीय लोक दलाच्या उमेदवार तबस्सूम यांनी कार्यकर्त्यांसमवेत विजय साजरा केला.

कैराना, नूरपूर मतदारसंघांचा भाजपला धडा

महेश सरलष्कर, नवी दिल्ली : 

उत्तर प्रदेशातील कैराना लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार मृगंका सिंह यांच्या पराभवाने विरोधकांच्या एकीकडे गांभीर्याने घेण्याची वेळ येऊन ठेपली असल्याचा धडा सत्ताधारी पक्षाला मिळाला आहे. याच उत्तर प्रदेशात भाजपला गेल्या वर्षी अभूतपूर्व यश मिळाले होते. मात्र, त्यानंतर झालेल्या प्रत्येक पोटनिवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. कैरानाचा निकाल भाजपसाठी विशेषत: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाची कसोटी पाहणारा होता, त्यांच्या अतिरेकी हिंदुत्वाचा मुद्दा फोल ठरल्याचेच स्पष्ट झाले आहे.

कैरानाचे भाजपचे गुज्जर खासदार हुकूम सिंह यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक घेण्यात आली. हुकूम सिंह यांची मुलगी मृगंका सिंह हिला भाजपने उमेदवारी दिली. सहानुभूतीच्या जोरावर विजय मिळवता येईल, हा भाजपचा तर्क पूर्ण फसला. उलट, या मतदारसंघातून राष्ट्रीय लोकदलाच्या तब्बसुम बेगम या मुस्लीम उमेदवाराने भाजपकडून हा मतदारसंघ हिसकावून घेतला.

तब्बसुम यांचा दणदणीत विजय हा अतिरेकी हिंदुत्वाला मतदारांनी घातलेला चाप असल्याचे मानले जात आहे. म्हणूनच ‘जीना नहीं गन्ना’ ही विरोधकांची घोषणा यशस्वी ठरली. योगींची सत्ता आल्यापासून उत्तर प्रदेशात हिंदुत्वाच्या मुद्दय़ावरून राज्यभर भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेले होते. अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील जीनांचा फोटोवरून विद्यापीठाच्या आवारातच हिंसक आंदोलन झाले होते. या पाश्र्वभूमीवर ही घोषणा दिली गेली. उत्तर प्रदेशात ऊस शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. उसाचे अतिरिक्त उत्पादन झाले असून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्याकडे योगी सरकारने फारसे लक्ष दिले नसल्याने शेतकऱ्यांची नाराजी ओढवून घ्यावी लागली. त्याचाच परिणाम निकालात दिसून आल्याचे मानले जाते.

कर्नाटकात पराभूत झाल्यानंतरही भाजप नेतृत्वाने विरोधकांच्या एकीकडे दुर्लक्ष केले होते. भाजपच्या म्हणण्यानुसार, पोटनिवडणुकीतील निकाल आगामी लोकसभा निवडणुकीवर परिणाम करणारे नाहीत. लोकसभेची निवडणूक देश डोळ्यासमोर ठेवून लढवली जाते. त्या दृष्टीने मतदान होत असते. पण, १५ पैकी फक्त दोन जागांवरच भाजपला विजय मिळवता आला आहे. वास्तविक, विरोधकांच्या एकीमुळे तब्बसुम यांना दलित, मुस्लीम आणि जाट या तीनही प्रभावी समाजघटकांनी मतदान केल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच भाजपला पराभव पत्करावा लागला.

योगी आदित्यनाथांचा चौथा पराभव

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पाच पोटनिवडणुकांत फक्त एका मतदारसंघात भाजपला विजय मिळवता आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यानंतर अत्यंत आक्रमक भाषण करीत जनसमुदायाला आकर्षित करण्याची ताकद योगींकडेच असल्याचे मानले जाते. पण गोरखपूर, फूलपूर आणि आता कैराना या लोकसभा मतदारसंघात विशेषत: हे मतदारसंघ योगींचे बालेकिल्ले मानले जातात, तिथेच भाजपला पराभूत व्हावे लागले आहे. नूरपूर विधानसभा मतदारसंघातही भाजपचा उमेदवार पराभूत झाला आहे. फक्त कानपूर इलाख्यातील सिकंदरा मतदारसंघातच योगींना यश मिळाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2018 3:51 am

Web Title: ganna worked not jinnah in kairana bypoll says rld
Next Stories
1 विरोधकांच्या एकीत भाजप पराभूत
2 गौरी लंकेश हत्याप्रकरणी आरोपपत्र दाखल
3 व्यसनमुक्तीसाठी व्यायाम आवश्यक!
Just Now!
X