News Flash

राजधानीतील गणेशोत्सव स्पर्धेत नोएडाचे गणराज मंडळ पहिले

दिल्ली मराठी प्रतिष्ठान ही दिल्लीतील मराठी मंडळींना एका व्यासपीठावर आणणारी संस्था आहे

संग्रहित छायाचित्र)

गुरुग्रामच्या सार्वजनिक समितीला दुसरे, तर आनंदवन कल्चरल सोसायटीला तिसरे पारितोषिक

राजधानी दिल्ली व परिसरामध्ये दरवर्षी उत्साहाने साजरा होणाऱ्या गणेशोत्सवामध्ये प्रथमच घेतलेल्या सजावट स्पर्धेत ग्रेटर नोएडामधील गणराज महाराष्ट्र मित्रमंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला, तर गुरुग्रामच्या (गुडगाव) सार्वजनिक उत्सव समिती मंडळाला दुसरा क्रमांक मिळाला. तिसरा क्रमांक पश्चिम विहारमधील आनंदवन कल्चरल सोसायटीला मिळाला.

दिल्ली मराठी प्रतिष्ठान या संस्थेने आयोजित केलेल्या या स्पर्धेचा निकाल येथील प्रतिष्ठित इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे सदस्य सचिव आणि मुख्य परीक्षक सच्चिदानंद जोशी यांनी शुक्रवारी जाहीर केला. प्रथम क्रमांकाला ५१ हजार रुपये, द्वितीय २१ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ११ हजार रुपयांचे बक्षीस आहे. याशिवाय सात मंडळांना उत्तेजनार्थ बक्षिसेही जाहीर करण्यात आली. लोकसत्ता या स्पर्धेचे माध्यम प्रायोजक होते. लोकसत्ता हे दिल्लीतून प्रकाशित होणारे एकमेव मराठी दैनिक आहे.

दिल्ली, गुरुग्राम, फरिदाबाद, गाझियाबाद, ग्रेटर नोएडा आदी राष्ट्रीय राजधानी परिसरातील (एनसीआर) विविध मंडळांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. त्यासाठी मंडळांनी मोठय़ा उत्साहाने सहभाग नोंदविला होता. परीक्षकांच्या पाच गटांनी मंडळांना प्रत्यक्ष भेटी देऊन सर्वंकष पाहणी केली होती. परीक्षण गुणतालिकेऐवजी कसोटी व मानकांच्या आधारे करण्यात आले असून काही मंडळांचे विविध क्षेत्रांतील कार्य सरस व वैशिष्टय़पूर्ण आढळल्याने त्यांना उत्तेजनार्थ बक्षिसे दिल्याची माहिती मुख्य परीक्षक जोशी यांनी दिली.

परिसर स्वच्छता, पर्यावरण रक्षण, सामाजिक संदेश देणारे देखाव्यांसाठी प्रोत्साहित करण्यासाठी गणेश मंडळांना प्रतिष्ठानने दिल्लीमध्ये प्रथमच हा उपक्रम राबविला होता. ही पारितोषिके दिल्ली मराठी प्रतिष्ठानतर्फे शुक्रवार २४ सप्टेंबर रोजी आयोजित एका सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते दिली जाणार आहेत.

दिल्ली मराठी प्रतिष्ठान ही दिल्लीतील मराठी मंडळींना एका व्यासपीठावर आणणारी संस्था आहे. मागील वर्षी थेट ‘इंडिया गेट’वर दिवाळी पहाट हा युवा गायक महेश काळे यांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम संस्थेने आयोजित केला होता. राजधानीतील सर्व गणेशोत्सव मंडळांना संस्थेने यंदा प्रथमच एका व्यासपीठावर आणले आहे.

उत्तेजनार्थ बक्षिसे

* मंडपाची सजावट, रंगसंगती, रोषणाई : श्रीगणेश सेवा मंडळ, लक्ष्मीनगर

* नावीन्यपूर्णता, कल्पकता, गणेशमूर्ती सजावटीची सुबकता : सह्याद्री सोसायटी, पटपडगंज

* वैशिष्टय़पूर्ण उपक्रम : छत्रपती शिवाजी मराठा मित्रमंडळ, करोलबाग

* परिसर स्वच्छता, प्रसन्नता, पर्यावरणपूरकता : गणेश मराठा मित्रमंडळ, चांदणी चौक

* विविध गुणदर्शन सादरीकरण : पूर्वाचल गणेश मंडळ, आनंदविहार

* कार्यकर्ता संच, सांस्कृतिक प्रबोधन : महाराष्ट्रीय सेवा समिती, इंदिरापूरम, गाझियाबाद आणि महाराष्ट्र मंडळ, गांधी कॉलनी, फरिदाबाद

बक्षीस विजेते

’प्रथम पारितोषिक

(५१ हजार रुपये) : गणराज महाराष्ट्र मित्रमंडळ, ग्रेटर नोएडा

’द्वितीय पारितोषिक

(२१ हजार रुपये) : सार्वजनिक उत्सव समिती, गुरुग्राम

’तृतीय पारितोषिक

(११ हजार रुपये) : आनंदवन कल्चरल सोसायटी,

पश्चिम विहार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 3:13 am

Web Title: ganpati decoration contest in delhi won by ganraj mitramandal noida
Next Stories
1 देशातील ‘व्हीआयपी संस्कृती’त वाढ !, ४७५ हून अधिक जणांना विशेष सुरक्षा
2 सीबीआयने मला प्रश्न विचारावेत, मुलाला त्रास देऊ नये; चिदंबरम यांचा संताप
3 इंग्रजीचा गृहपाठ केला नाही म्हणून ८ वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
Just Now!
X