अनुदानावर मिळणाऱ्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत ७ रूपयांनी वाढ झाली आहे. यापुढे आता दर महिन्याला सिलिंडरचे दर वाढवण्यात येणार आहेत. सरकारने या आर्थिक वर्षांत गॅस सिलिंडरवरील संपूर्ण अनुदान हटवण्याचा निर्णय घेतला आहे. इंडियन ऑइल कार्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, आता दिल्लीत १४.२ किलोचा घरगुती स्वंयपाकाचा गॅस सिलिंडर ४८७.१८ रूपयांना मिळेल. पूर्वी याची किंमत ४७९.७७ रूपये होती. सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांना अनुदानित  सिलिंडरच्या किंमती ४ रूपयांनी वाढवण्याच्या सूचना केल्याचे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद प्रधान यांनी दि.३१ जुलै रोजी लोकसभेत सांगितले होते. मार्चपर्यंत अनुदान बंद करण्याचा सरकारचा मानस आहे. दि. १ ऑगस्ट रोजी सिलिंडरच्या किंमतीत २.३१ पैशांनी वाढ झाली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तेल कंपन्यांनी ऑगस्ट महिन्यात सिलिंडरच्या दरात निश्चित दरापेक्षा कमी वाढ केली होती. त्या फरकाची रक्कम या महिन्याच्या वाढीव किंमतीत समावेश केली आहे.

गेल्यावर्षी जुलैपासून दर महिना प्रति सिलिंडरच्या दरात २ रूपये वाढ करण्याचा नियम लागू केल्यानंतर अनुदानित सिलिंडरच्या किमतीत ६८ रूपयांनी वाढ झाली आहे. जून २०१६ मध्ये १४.२ किलो एलपीजी सिलिंडरची किंमत ४१९.१८ रूपये इतकी होती. सरकारने प्रथम इंडियन ऑइल कार्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (बीपीसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या (एचपीसीएल) अनुदान असलेल्या घरगुती सिलिंडरच्या किंमती (व्हॅट सोडून) दर महिना २ रूपये वाढवण्यास सांगण्यात आले होते. आता २ ऐवजी ४ रूपये वाढवण्यास सांगण्यात आले आहे. अनुदान शून्यापर्यंत आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

एका वर्षांत एका कुटुंबाला अनुदान असलेले १२ सिलिंडर दिले जातात. वर्षांत १२ पेक्षा जास्त सिलिंडर झाले तर त्या व्यक्तीला बाजार मूल्यानुसार १३ वा सिलिंडर खरेदी करावा लागत असे. अनुदान नसलेल्या गॅस सिलिंडरच्या किमतीत ७३.५ रूपयांची वाढ करण्यात आली आहे. त्याची किंमत आता ५९७.५० पैसे इतकी झाली आहे. गतवेळी यामध्ये ४० रूपयांनी घट झाली होती. त्याचबरोबर कंपन्यांनी एव्हिएशन टर्बाइन इंधन (एटीएफ) दरात ४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.