बंगळुरू येथे अलिकडेच कार्यकर्त्यां पत्रकार गौरी लंकेश यांची झालेली हत्या दुर्दैवी व लोकशाहीस घातक आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे. लंकेश या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या पत्रकार होत्या, त्यांची राहत्या घराच्या बाहेर मंगळवारी हत्या झाली होती. त्या डाव्या विचारसरणीच्या समर्थक व हिंदुत्ववादी राजकारणाच्या विरोधक होत्या. त्यांच्या हत्येनंतर देशभरात निषेधाचे सूर उमटले होते.

दक्षिण आशिया विषयक काँग्रेसच्या उपसमितीसमोर बोलताना कार्यकारी सहायक परराष्ट्रमंत्री अलाइस वेल्स यांनी सांगितले, की भारतात धार्मिक अल्पसंख्यांकांना घटनात्मक संरक्षण दिले जाते. राज्यघटना व कायद्यानुसार असलेल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी भारताला आम्ही उत्तेजन देत आहोत. आम्ही मानवी हक्क अहवाल व आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य अहवालात नेहमीच भारतातील काही घटनांचा उल्लेख वारंवार केला आहे. पत्रकार लंकेश यांची या आठवडय़ात झालेली हत्या ही दुर्दैवी आहे, त्या नेहमीच कथित राष्ट्रवाद्यांच्या टीकेचे लक्ष्य बनल्या होत्या. भारतीय लोकशाहीला अशा घटनांमधून आव्हान मिळत आहे. पण भारतात लोकशाही आहे व ती संवेदनशील लोकशाही आहे, असे आम्ही मानतो. भारतीय संस्थात्मक रचनेची आव्हानांना तोंड देण्याची क्षमता आहे. किंबहुना लोकशाहीचे रक्षण करण्याची त्यांची क्षमता वाढवण्यासाठी आम्ही भारत सरकारशी सतत संपर्कात राहू.