कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी आणखी चार संशयितांची नावे समोर आली आहेत. विशेष तपास पथकाने दाखल केलेल्या गुन्ह्यात सात नावांचा समावेश करण्यात आला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चार नवीन नावांचा यात समावेश करण्यात आला आहे. लंकेश यांची हत्या आणि कटात या चौघांचा सहभाग असल्याचे सांगण्यात येते.

 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लंकेश यांच्यावर गोळी झाडणाऱ्या परशुराम वाघमारेला जुलै २०१७ मध्ये दोघांनी बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण दिले होते. हत्येच्या दोन महिन्यांपूर्वी हे प्रशिक्षण देण्यात आले होते. बेळगावी जिल्ह्यातील जंगलात एअर गन पिस्तूलने वाघमारेला हे प्रशिक्षण देण्यात आले होते. वाघमारेला जवळून गोळी झाडण्याचे प्रशिक्षण फक्त दोन दिवस देण्यात आले होते.

हत्येवेळी जी बंदूक वापरण्यात आली त्यावर केस आढळून आला होता. ही बंदूक बेंगळुरूतील एका घरात लपवण्यात आली होती. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींपैकी एखाद्याशी तो जुळतो का हे पाहण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. पोलिसांच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा पुरावा आहे.

गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणातील मास्टरमाईंड हा एका हिंदुत्ववादी संघटनेचा प्रमुख कार्यकर्ता आहे. या संघटनेच्या हिटलिस्टमध्ये ३७ नावे होती. गौरी लंकेश यांचाही यात समावेश होता. तपास पथकाला जी डायरी मिळाली आहे ती अमोल काळेकडे सापडली आहे. हस्ताक्षरतज्ज्ञाकडे ही डायरी पाठवण्यात आली आहे. हत्येवेळी वापरण्यात आलेल्या बाईकचा शोध पोलीस घेत आहेत.