ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) बेळगावमधून एकाला अटक केली आहे. सागर लाले असे या संशयित आरोपीचे नाव असून परशुराम वाघमारेला आश्रय दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये गौरी लंकेश यांची बेंगळुरुतील निवासस्थानी हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास कर्नाटक एसआयटीकडून सुरु आहे. गौरी लंकेश यांची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी परशुराम वाघमारे याला अटक केली होती. बुधवारी कर्नाटक एसआयटीने या प्रकरणात बेळगावमधून आणखी एकाला अटक केली. सागर लाले असे या तरुणाचे नाव असून वाघमारेला आश्रय दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

दरम्यान, गौरी लंकेश यांची हत्या कशी झाली याचा उलगडाही पोलिसांनी केला. लंकेश यांच्या हत्येचा कट जवळपास वर्षभरापूर्वीच रचण्यात आला होता. अमोल काळे हा हत्येचा मास्टरमाईंड असून त्याने श्रीराम सेनेच्या वाघमारेला लंकेश यांची हत्या करण्यास सांगितले. बेळगावमध्ये वाघमारेने पिस्तूलने शुटिंगचा सराव देखील केला. जुलै २०१७ मध्ये वाघमारे पहिल्यांदा बेंगळुरुत गेला होता, असे पोलीस तपासात उघड झाले आहे.