ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा तपास विशेष चौकशी पथकामार्फत (एसआयटी) करण्यात येणार आहे. घटनेच्या तपासासाठी पोलीस महानिरीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष चौकशी पथक स्थापन करण्याचे आदेश कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दरमय्या यांनी बुधवारी दिले. ‘लंकेश पत्रिका’ या साप्ताहिकाच्या संपादिका असलेल्या लंकेश यांची काल, मंगळवारी हत्या करण्यात आली होती. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या घराबाहेरच त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ आज सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार संघटनांनी देशभरात निदर्शने केली.

 

ही घटना माझ्यासाठी धक्कादायक आहे. त्यांच्या मृत्यूने मोठे नुकसान झाले आहे. अलिकडेच त्या मला भेटल्या होत्या. मात्र, जीवे मारण्याच्या धमकीबाबत त्या काही म्हणाल्या नव्हत्या, असे मुख्यमंत्री सिद्दरमय्या यांनी सांगितले. त्यांच्या हत्येचा कट पूर्वनियोजित होता, असा दावाही त्यांनी केला. २०१५ मध्ये ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांचीही अशाच प्रकारे हत्या झाली होती, असे त्यांचे समर्थक आणि मित्रपरिवार म्हणत आहे. पण मुख्यमंत्र्यांनी ही बाब फेटाळली. कलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्यांचा एकमेकांशी संबंध असल्याचा कोणताही पुरावा अद्याप सापडला नाही, असे ते म्हणाले.

सामाजिक कार्यकर्त्यांना संरक्षण देण्याबाबतच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. लंकेश यांच्या हत्येनंतर त्यांच्याविरोधात दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या होत्या. या पोस्टशी आणि हत्येच्या घटनेचा काही संबंध आहे का, याची चौकशी करण्यात येत आहे. या दोघा संशयितांचीही चौकशी करण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, लंकेश यांच्या हत्येच्या घटनेचा तपास बंगळुरू पोलीस करत आहेत. मात्र, त्यांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून लंकेश यांच्या कुटुंबियांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. कलबुर्गी हत्येचा तपासही राज्याच्या पोलिसांनी केला होता. पण अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत ते पोहोचले नाहीत. त्यामुळे या हत्येच्या तपासाची गतही तशीच होईल, अशी भीती लंकेश यांच्या बंधूंनी व्यक्त केली आहे. या हत्येच्या घटनेमागील सत्य लवकर बाहेर यावे, यासाठी सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.