ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती ठोस पुरावे लागले आहेत. लंकेश यांच्या हत्येपूर्वी संशयितांनी त्यांच्या घराची ‘रेकी’ केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. मोटरसायकलीवरून आलेल्या संशयितांनी त्यांच्या घराच्या तीन चकरा मारल्याचे त्यात दिसून येत आहे. अंदाजे ३५ वर्षांची एक संशयित व्यक्ती सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे, असे सूत्रांनी सांगितले.

५ सप्टेंबरला गौरी लंकेश यांची रात्री अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्याच दिवशी मोटरसायकलवरून आलेल्या व्यक्तींनी त्यांच्या घराची रेकी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. संशयितांनी त्यांच्या घराच्या तीन चकरा मारल्या आहेत. एका संशयिताने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि पॅंट घातली होती. त्याने हेल्मेट घातले होते. तो अंदाजे ३५ वर्षांचा असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हत्येच्या काही तासांपूर्वी संशयित व्यक्ती गौरी यांच्या घराच्या दिशेने आला होता. काही अंतर पुढे गेल्यानंतर त्याने पुन्हा आपली मोटरसायकल वळवली. तीच व्यक्ती पहिल्यांदा दुपारी ३.२७ वाजता घराजवळ आली होती. त्यानंतर पुन्हा संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास घराच्या आसपास संशयास्पदरीत्या फिरत होती. तिसऱ्यांदा जेव्हा ती व्यक्ती घराजवळ आली त्यावेळी पाठीवर एक काळी बॅग होती. या बॅगमध्ये शस्त्रे असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, या घटनेची चौकशी एसआयटीमार्फत करण्यात येत आहे. ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांची ज्या लोकांनी हत्या केली, त्यांनीच लंकेश यांची हत्या केली असावी, असा तपास पथकाला संशय आहे.