ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची काल (मंगळवारी) बंगळुरुत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेवरून राजकारण सुरू झाल्याचे दिसून येत आहे. लंकेश यांच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची विचारसरणी असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केला आहे. तर राहुल गांधींचे आरोप तद्दन मूर्खपणाचे आहेत, असा पलटवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.

गौरी लंकेश या उजव्या विचारसरणीच्या कडव्या विरोधक होत्या. काल रात्री त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. लंकेश यांच्या हत्येनंतर राहुल गांधींनी संघ आणि भाजपवर निशाणा साधला. ‘भाजपच्या विचारसरणीविरोधात बोलणाऱ्या, संघाची विचारसरणी आवडत नसलेल्या व्यक्तींवर दबाव आणला जातो. अशा व्यक्तींवर हल्ले केले जातात. त्यांना मारहाण केली जाते आणि त्यांच्या हत्याही केल्या जातात,’ अशी टीका गांधींनी संघ आणि भाजपवर केली. त्यांच्या टीकेला भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी प्रत्युत्तर दिले. गांधींचे आरोप मूर्खपणाचे असल्याचे ते म्हणाले. ‘राहुल गांधींच्या टीकेला कोणताही आधार नाही. त्यांचे आरोप बिनबुडाचे आहेत,’ असेही ते म्हणाले.

गौरी लंकेश यांच्या हत्येवरुन राहुल गांधींनी भाजप, संघासह पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. ‘देशात केवळ एकच विचारसरणी असावी, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पंतप्रधान मोदी याबद्दल काहीच बोलले नाहीत. अनेकदा दबाव निर्माण झाल्याशिवाय मोदी बोलतच नाहीत,’ असेही राहुल म्हणाले. ‘मोदी हे अत्यंत चतुर हिंदुत्ववादी नेते आहेत. त्यांच्या शब्दांचे दोन अर्थ असतात. त्यांच्या लोकांसाठी (समर्थक) एक आणि उर्वरित जगासाठी दुसरा अर्थ असतो,’ अशी टीकाही गांधींनी केली.

राहुल गांधींच्या मोदींवरील टीकेलाही नितीन गडकरींनी उत्तर दिले. ‘मोदी सध्या भारतात नाहीत. प्रत्येक मुद्यावर पंतप्रधानांनी बोलावे अशी अपेक्षा करता येऊ शकत नाही,’ असेही त्यांनी पुढे बोलताना म्हटले. गौरी लंकेश उजव्या विचारसरणीच्या विरोधक होत्या. त्यांच्याविरोधात खासदार प्रल्हाद जोशी यांनी मानहानीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणात त्यांना मागील वर्षी दोषी ठरवण्यात आले होते.