ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देऊ नये अशी मागणी त्यांच्या बहिणीने केली आहे. जर कर्नाटक सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे ठरवले तर आपण पक्षकार होऊन या निर्णयास सुप्रीम कोर्टात विरोध दर्शवू असे कविता लंकेश यांनी म्हटले आहे. कर्नाटक पोलिसांनी गौरी लंकेश हत्या प्रकरणाच्या तपासात प्रगती केली आहे. आत्तापर्यंत या प्रकरणी 16 जणांना अटक झाली आहे. पोलीस त्यांचे काम व्यवस्थित करत आहेत असेही कविता लंकेश यांनी म्हटले आहे.

गौरी लंकेश, एम.एम. कलबुर्गी, गोविंद पानसरे आणि नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्यांमध्ये एकसूत्रता दिसत असल्याने या प्रकरणाचा तपासही सीबीआयकडे दिला जावा असे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते. मात्र गौरी लंकेश प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवू नये अशी मागणी त्यांच्या बहिणीनेच केली आहे. आत्तापर्यंत 16 आरोपींना अटक झाली आहे. दोन आरोपपत्रंही दाखल झाली आहेत. तपास इतका पुढे गेल्यानंतर तो आता सीबीआयला सोपवण्यात काही अर्थ नाही असेही कविता लंकेश यांनी म्हटले आहे.

ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत गौरी लंकेश यांची 5 सप्टेंबर 2017 ला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे सगळा देश हादरला होता. यानंतर गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत याप्रकरणी 16 जणांना अटक करण्यात आली आहे. आता हे प्रकरण सीबीआयकडे देऊ नये अशी मागणी गौरी लंकेश यांची बहीण कविता लंकेश यांनी केली आहे.