आजवर आशियाई सिंह हे गुजरातचे खास आकर्षण राहिले असले तरी आता तेथे गोपर्यटन सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी गोपर्यटन प्रकल्प आखण्यात आला आहे. गोपालन राज्यात लोकप्रिय करण्यासाठी गुजरात राज्य गोसेवा आयोगाने ही योजना आखली आहे. गोपालन व इतर बाबी जाणून घेण्याची इच्छा असलेल्या पर्यटकांना याचा फायदा होणार आहे.

गोमूत्र व शेण यांपासून विविध पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षणही यात दिले जाणार आहे. गोपर्यटन योजना प्रत्येकी दोन दिवसांची राहील व त्यात गोशाळा दाखवल्या जातील, असे गोसेवा आयोगाचे अध्यक्ष वल्लभ कथिरिया यांनी सांगितले.

गोपर्यटनातून लोकांना गोपालनाचे आर्थिक महत्त्व पटवले जाणार आहे. गाय पाळून पैसे कसे मिळवावेत हे लोकांना माहिती नाही. पण गोपालनातून बायोगॅस, औषधे यांची निर्मिती करता येते. धार्मिक व आर्थिक हेतू एकत्र आणून गोपालनाचे हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. गोमूत्र हे औषध असून त्यात जंतूनाशक गुणधर्म आहेत. त्यापासून सेंद्रिय फिनाईल व साबण तयार करता येतो. गाईच्या शेणापासून बायोगॅस, खते, उदबत्त्या बनवता येतात. या प्रकल्पात दोन दिवसांची सहल असून त्यात गोपालनातील अर्थकारण शिकवले जाते. धर्मराद या आणंद येथील खेडय़ात गोशाळा असून तिथे ही सहल नेली जाते. तेथे गायींसाठी कुरण तयार केले असून अनेक पर्यटकांनी आता भेट देण्यास सुरुवात केली आहे. गोसंरक्षण ही गुजरातची प्राथमिकता बनली असून राज्य सरकारने गोहत्याप्रतिबंधासाठी कडक कायदा केला आहे व त्यासाठी जन्मठेपेची शिक्षा आहे. सध्या अहमदाबाद, राजकोट व भुज येथील तुरुंगात गोछावण्या आहेत. गोंडाल व अमरेली येथेही तुरुंगात गोशाळा सुरू केल्या जाणार आहेत, अशी माहिती कथिरिया यांनी दिली.