भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, रवीशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत गौतम गंभीर याने भाजपात प्रवेश केला. गौतम गंभीरने भाजपात प्रवेश केल्याने पक्षाला नक्कीच फायदा होईल असा विश्वास अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे. नरेंद्र मोदींच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपात प्रवेश केला असल्याचं यावेळी गौतम गंभीरने सांगितलं. देशासाठी काम करण्याची संधी दिल्याबद्दल यावेळी गौतम गंभीरने भाजपाचे आभार मानले.

गौतम गंभीरला लोकसभा निवडणुकीचं तिकीट देण्यासंबंधी बोलण्यास यावेळी अरुण जेटली यांनी नकार दिला. तिकीट देण्यासंबंधीचा निर्णय निवडणूक समितीवर सोडून देऊयात. गौतम गंभीर यांना योग्य ती जबाबदारी देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व जागांवर विजयी पताका फडकवण्यासाठी भाजपा पुरेपूर प्रयत्न करत असून काही मोठे बदल केले जात असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. गौतम गंभीरचा प्रवेश त्याचाच एक भाग असल्याचं म्हटलं जात आहे.

यावेळी अरुण जेटली यांनी सॅम पित्रोदा यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. सॅम पित्रोदा यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं. ज्यांनी देशाची समज नाही तेच लोक असं वक्तव्य करतात अशी टीका त्यांनी केली. आम्ही केलेले दोन्ही ऑपरेशन यशस्वी राहिले असून, आधी देशात घुसून दहशतवादी हल्ल्या करणाऱ्यांवर कारवाई व्हायची. पण आता जिथून दहशतवादाला सुरुवात होते तिथेच कारवाई केली जात आहे असं अरुण जेटली यांनी यावेळी सांगितलं.

सॅम पित्रोदा आज पाकिस्तानच्या टीआरपीत पहिल्या क्रमांकावर असतील असा टोला यावेळी अरुण जेटली यांनी लगावला. कोणताही सामना बॅकफूटवर खेळत जिंकला जाऊ शकत नाही असं सांगताना देशाच्या सुरक्षेसाठी आम्ही फ्रंट फूटवर आहोत असं अरुण जेटली यांनी सांगितलं.