हैदराबादमधील बलात्कार प्रकरण काही दिवसांपासून चर्चेत होते. या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना शुक्रवारी मध्यरात्री ठार करण्यात आले. पोलीस एन्काऊंटरमध्ये हे चारही आरोपी ठार झाले. या चार आरोपींनी प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी घटनास्थळी नेण्यात आले होते. त्या वेळी त्या आरोपींनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना पळून न जाण्याचा इशारा दिला होता, पण त्यांनी पळण्याचा प्रयत्न केल्यामुळे नाईलाजाने पोलिसांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्या चकमकीत चारही आरोपी ठार झाले.

हैदराबाद प्रकरणात आरोपी असणारे चार जण पोलीस चकमकीत मारले गेल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर काहींनी याबाबत संशय व्यक्त केला, पण बहुतांश भारतीयांनी पोलिसांचे कौतुक केले. भाजपा खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर म्हणाला की न्यायव्यवस्थेत बदल घडणे अपेक्षित आहे. फास्ट ट्रॅक कोर्टाने दिलेला निर्णय हा अंतिम असायला हवा. त्या निर्णयावर पुढे कुठेही याचिका करण्याची संधी देण्यात येऊ नये. तसेच मृत्यूदंडाच्या शिक्षेवर दया याचिका करण्याची तरतूद नसावी. हैदराबाद प्रकरणात जर आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला असेल, तर माझा पोलिसांना पाठिंबा आहे.

आणखी वाचा- “कायद्याच्या रक्षकांचा समाजातील राक्षसांवर विजय”

दरम्यान, संपूर्ण देशात या प्रकरणाबाबत संतापाची लाट होती. आम्ही मुख्यमंत्र्यांना फाशीच्या शिक्षेबद्दल विचारणा केली होती. त्यांना तातडीनं शिक्षा होणं गरजेच होतं. आरोपी पळून गेले असते, तर पुन्हा अशी घटना घडली असती. त्यामुळे बलात्कार प्रकरणातील प्रत्येक आरोपीला अशी शिक्षा होणं गरजेचं आहे, असे मत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले.

आणखी वाचा- “भविष्यात ‘असं’ दुष्कृत्य करण्याची हिंमत नाही झाली पाहिजे”

पोलिसांशी झालेल्या चकमकीत आरोपी मारले गेले आहेत, ही घटना ऐकून आम्हाला धक्का बसला. पण या प्रकरणातील आरोपींना शासन मिळाल्याचा आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया पीडितेच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली.