ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात देण्यात आलेल्या लाचप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने उद्योगपती गौतम खेतान यांना अटक केली असून त्यांना मंगळवापर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्ली न्यायालयाने दिले आहेत. खेतान यांची कोठडीत अधिक चौकशी करण्याची गरज नाही, असे संचालनालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आल्यानंतर महानगर दंडाधिकारी स्निग्धा सरवरिया यांनी खेतान यांना दोन दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
खेतान यांनी जामिनासाठी अर्ज केला असून त्या संदर्भात मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी संचालनालयाला मंगळवापर्यंत आपले म्हणणे मांडण्याची मुभा दिली आहे. खेतान यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्याच दिवशी जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
चौकशीदरम्यान आपण संबंधितांना पूर्ण सहकार्य केले आहे, त्यामुळे आपल्याला जामीन मिळावा, असे खेतान यांचे म्हणणे आहे. गेल्या जुलै महिन्यात खेतान यांना लाचप्रकरणी अटक करण्यात आली होती.