डिसेंबरमध्ये आनंद तेलतुंबडे यांच्याही अटकपूर्व जामिनासाठीच्या याचिकेवर सुनावणी

शहरी नक्षलवादाप्रकरणी मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांना उच्च न्यायालयाने अटकेपासून २ डिसेंबपर्यंत अंतरिम दिलासा दिला. तसेच २ डिसेंबर रोजी नवलखा आणि या प्रकरणातील सहआरोपी आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपूर्व जामिनासाठीच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

पुणे सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर नवलखा यांनी अटकेपासून दिलासा मिळवण्यासाठी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शुक्रवारी याचिकेवर झालेल्या सुनावणीच्या वेळी नवलखा यांच्यासह तेलतुंबडे यांनीही अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या याचिकेवर २ डिसेंबर रोजी सुनावणी घेण्याचे न्यायालयाने निश्चित केले. नवलखा यांच्या याचिकेवरील सुनावणी शुक्रवापर्यंत तहकूब करताना न्यायालयाने त्यांना अटकेपासून दिलासा देण्यास नकार दिला होता. त्यामुळे याचिकेवरील पुढील सुनावणीपर्यंत नवलखा यांना अटकेपासून अंतरिम संरक्षणही द्यावे, अशी मागणी त्यांच्या वकिलांतर्फे करण्यात आली.

गेल्या वर्षीपासून त्यांना अटकेपासून अंतरिम दिलासा देण्यात आला आहे. या कालावधीत पोलिसांनी त्यांचा जबाब का नोंदवून घेतला नाही. आताच त्यांना त्यांच्या कोठडीची एवढय़ा तातडीने आवश्यकता का आहे, असा सवालही नवलखा यांचे वकील युग चौधरी यांनी उपस्थित केला. तसेच नवलखा यांना २ डिसेंबपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला.

विशेष सरकारी वकील अरुण कामत यांनी त्यांच्या मागणीला तीव्र विरोध केला. मात्र न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी नवलखा यांची मागणी मान्य करत पुढील सुनावणीपर्यंत त्यांना अटकेपासून दिलासा दिला.