पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिला आहे. आम्ही स्वतःहून कोणालाही छेडणार नाही. पण जर कोणी आम्हाला छेडले तर त्याला सोडणारही नाही, या शब्दांत राजनाथ सिंह यांनी मंगळवारी लखनऊमध्ये पाकिस्तानचे नाव न घेता त्यांना योग्य तो इशारा दिला.
दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह हे दोघेही मंगळवारी लखनऊमध्ये आहेत. तिथेच आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात राजनाथ सिंह यांनी सर्जिकल स्ट्राईकवरून सैन्याचे कौतुक केले. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून भारताने आपली ताकद दाखवून दिली आहे. त्याचबरोबर संपूर्ण जगाला भारत शक्तिशाली देश असल्याचा संदेशही दिला असल्याचे राजनाथ सिंह यांनी या कार्यक्रमात सांगितले. भारत विनाकारण कोणत्याही देशाची छेड काढणार नाही. पण जर कोणी आमची छेड काढली तर त्याला सोडणारही नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
दसऱ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रामलीला कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांचे सोमवारी संध्याकाळीच लखनऊमध्ये आगमन झाले. या कार्यक्रमासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळते आहे. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक हे मात्र या कार्यक्रमासाठी लखनऊमध्येच असून, ते व्यासपीठावरही उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच त्यांच्या मतदारसंघातील रामलीला कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. पुढील वर्षाच्या सुरुवातीला उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका होता आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये रंगली आहे.