१४ दिवसांची कोठडी; सगळे कुटुंबच आता तुरुंगात

बिहारमध्ये गया जिल्ह्य़ात उद्योजकाचा मुलगा आदित्य सचदेव याचा रस्त्यावर गाडीला मागे टाकण्याच्या रागातून खून झाल्याच्या प्रकरणी आरोपी रॉकी यादव याची आई व जनता दल संयुक्तच्या निलंबित विधान परिषद सदस्या मनोरमादेवी यांनी न्यायालयात शरणागती पत्करली असून तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली.

मंगळवारी सकाळी मनोरमादेवी या अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी सोमसागर यांच्यापुढे हजर झाल्या. त्यांना कोठडी देण्यात आली आहे. त्यांचा मुलगा रॉकी याने त्याच्या गाडीला आदित्य सचदेव व त्याच्या मित्रांच्या गाडीने मागे टाकल्याच्या रागातून आदित्यचा खून केला होता. त्यानंतर मनोरमादेवी यांच्यावरही अटक  वॉरंट काढले होते, पण त्या बेपत्ता होत्या. त्यांचा मुलगा रॉकी याचा शोध घेत असताना त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला तेव्हा दारूच्या बाटल्या सापडल्या होत्या. मनोरमादेवी यांची मालमत्ता जप्त करण्याच्या पोलिसांच्या मागणीवर न्यायालयाने अजून निकाल दिलेला नाही. पोलिसांनी प्रचंड दबाव आणल्याने निलंबित आमदार मनोरमादेवी शरण आल्या, असा दावा गयाच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षक गरिमा मलिक यांनी केला आहे. आमदार मनोरमादेवी यांच्या शरणागतीने आता त्यांचे पती, मुलगा यांच्यासह सर्व कुटुंबच तुरुंगात आहे. आदित्य सचदेव या बारावीतील विद्यार्थ्यांने रॉकीच्या गाडीला मागे टाकून पुढे जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यात बाचाबाची झाली व त्यात रॉकीने केलेल्या गोळीबारात आदित्य ठार झाला होता. आदित्य व त्याच्या मित्रांची मोटार होती, तर रॉकीचे एसयूव्ही वाहन होते.

मनोरमादेवी यांचे वकील महंमद सरफुद्दीन यांनी सांगितले की, आमच्या अशिलास बरे वाटत नसून वैद्यकीय सुविधा देण्याची गरज आहे. त्यांची विनंती न्यायालयाने मान्य केली आहे. न्यायालयातून तुरुंगात नेताना मनोरमादेवी यांनी असा आरोप केला की, भाजपने आपल्याविरोधात कट केला आहे. मी दारू पित नाही त्यामुळे घरात दारूच्या बाटल्या कशाला ठेवीन, असा प्रश्न त्यांनी पत्रकारांना केला. दरम्यान मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गया येथील हे प्रकरण व सिवान येथे राजदेव रंजन या पत्रकाराचा झालेला खून यात कुणाचीही गय केली जाणार नाही असे सांगितले असून पत्रकार हत्येचे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची शिफारस केली आहे.