बिहारमधील गया जिल्ह्य़ातून शहरातील एका नामांकित डॉक्टरचे त्याच्या पत्नीसह अपहरण करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सदर डॉक्टरचे नाव पंकज गुप्ता असे असून ते आपल्या पत्नीसमवेत झारखंडमधील विवाह समारंभाहून परतताना त्यांचे अपहरण करण्यात आल्याचे शहर पोलीस अधीक्षक राकेशकुमार यांनी सांगितले.
या बाबत गुप्ता यांच्या भावाने केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गुप्ता यांच्या दवाखान्यातील मदतनीसाने त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला तेव्हा डॉक्टर गुप्ता यांनी आपण गया शहरानजीकच्या बारचट्टी येथपर्यंत पोहोचल्याचे सांगितले.
त्यानंतर बराच वेळ लोटूनही डॉक्टर न परतल्याने मदतनीसाने पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतरही ते न परतल्याने त्यांचे अपहरण झाले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.